अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी मरण्यापूर्वी अफजल गुरूचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचा संदेश भिंतीवर लिहल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय संसदेवर २००० साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अफजल गुरूला २०१३मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याच्या बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा संदेश दहशतवाद्यांनी स्वत:च्या रक्ताने भिंतीवर लिहिला असल्याचे अफगाण पोलिसांनी सांगितले. भारतीय दूतावासावर गोळीबार करण्यात येत असलेल्या इमारतीचा ताबा घेतल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली. याठिकाणच्या भिंतीवर उर्दू भाषेत ‘ अफजल गुरू का इन्तकाम’, ‘एक शहीद हजार फियादीन’ अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.
शनिवारी चार दहशतवाद्यांनी ‘मझार ए शरीफ’ येथील भारतीय दूतावासावर हल्ला चढवला होता. मात्र, इंडो-तिबेटियन सुरक्षा दल आणि अफगाण लष्कराच्या जवानांनी हा हल्ला परतवून लावला होता. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान व अफगाणिस्तानचा दौरा केल्यानंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. काबूलमधील नागरी सरकारला भारताचा पाठिंबा आहे. तालिबानने सरकारी व परदेशी आस्थापनांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. काबूलमध्ये आठवडय़ाअखेरीस अनेक हल्ले केले होते.