मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाची बेल वाजवून पळून जाणे, अश्लील फोन कॉल्स करणे, पाणी-वीज कनेक्शन तोडणे, कारचा पाठलाग, लहान मुलांना दहशत दाखवणे असली कृत्य शेजारी किंवा आपल्यावर राग धरुन असलेला एखादा परिचित करु शकतो. या प्रकरणातही शेजाऱ्याचाच हात आहे. पण हा इमारतीमधला किंवा कॉलनीमधला शेजारी नाहीय. तर तो एक शेजारी देश आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारचा त्रास दिला जातोय.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परस्परांवर आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना त्रास दिल्याचा आरोप केलाय. महत्वाचं म्हणजे यात लहान मुलांदेखील सोडलेल नाहीय. त्यांना देखील धमकावलं जातयं. पाकिस्तानात भारतीय दूतावासात काम केलेले राजनैतिक अधिकारी विष्णू प्रकाश यांनी सांगितल कि, अनेकदा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ति माझ्या घराची डोअरबेल वाजवून पळून जायचे. पाकिस्ताननेही भारतावर असाच आरोप केला आहे.

दिल्लीमधील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना भारतीय यंत्रणा विनाकारण त्रास देत आहेत असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने भारतातील आपले उच्चायुक्त सोहेल महमूद यांना इस्लामाबादला बोलावून घेतले आहे. दूतावासातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्रास दिल्या प्रकरणी उच्चायुक्तांशी चर्चा करणार आहोत असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले. भारतात राहणारे आमचे राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत असा आरोप मोहम्मद फैझल यांनी केला. या प्रकरणी आम्ही भारताचे उपउचायुक्त आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे असे फैझल यांनी सांगितले.