फ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून मागोमाग चीन, जपान, जर्मनी व ब्रिटन हे देश आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराश्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज आहे. वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (2018 मध्ये 6.6 टक्के व 2019 मध्ये 6.4 टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.
चीनमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची अपेक्षा असून भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. 2017 मध्ये भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढला मात्र याच कालावधीत चीनचा जीडीपी 6.8 टक्क्यांनी वाढला. त्या वर्षी विकसनशील देशांमध्ये सगळ्यात जास्त गतीनं वाढणारा देश अशी चीनची ओळख झाली. मात्र नंतरच्या दोन वर्षांमध्ये चीनला भारत मागे टाकेल असा अंदाज आहे. त्यातही विशेष म्हणजे आधी भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्क्यांच्या गतीने वाढली होती, मात्र नोटाबंदीमुळे 2017 मध्ये ही वाढ मंदावत 6.7 टक्क्यांवर आली.
आता पुन्हा एकदा सगळ्यात वेगाने वाढणारा देश बिरूद मिरवण्यास भारत सज्ज झाला असून समाधानकारक होत असलेल्या पावसामुळे ही घोडदौड अशीच सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2018 4:38 pm