भारताचे हितसंबंध असलेल्या सागरी परिसरामध्ये चिनी नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा यांचा वावर वाढला असून त्यावर केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील अनेक नौदलांचे बारीक लक्ष आहे. त्या निरिक्षणानुसार आपल्या रणनितीमध्ये सुयोग्य बदलही करण्यात येतील आणि भारतीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी भारतीय नौदलाचा प्रभावी वावर तर कायम राहीलच पण प्रसंगी त्याच गरजेनुसार वाढही करण्यात येईल, असे संकेत भारतीय नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी शुक्रवारी येथे दिली.

नौदल दिनाच्या निमित्ताने ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत व्हाइस अ‍ॅडमिरल लुथ्रा बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील ग्वादार बंदरामधून चिनी व्यापारी मालाच्या वाहतुकीस सुरुवात झाली आहे. तेथील घडामोडींवरही भारतीय नौदल लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षभरात भारतीय संरक्षण दलांच्या तळावर झालेल्या हल्ल्यांनंतर सर्वच तळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नौदलाने त्यांच्या अनेक तळांवरील सुरक्षेचा आढावा बारकाव्यानिशी घेतला आहे. नौदल तळांच्या सुरक्षेसाठी काही ठिकाणी वीजप्रवाह खेळविलेले कुंपण घालण्यात आले आहे. मात्र सर्वच ठिकाणी ते शक्य नाही. मात्र सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी सर्वतोपरी घेतली जात आहे. त्यासाठी नौदलाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधारही घेतला आहे. शिवाय इतर सुरक्षा यंत्रणांसोबत सुरक्षा सरावही केला आहे. जमिनीवरून तसेच समुद्रातून असलेला धोका या दोन्ही पातळ्यांवर सुरक्षा आढावा व्यवस्थित घेण्यात आला आहे. मुंबईनजिक समुद्रामध्ये मध्यंतरी काही सांकेतिक संभाषण झाल्याची तक्रार होती, त्या संदर्भातही तपास करण्यात आला असून सुरक्षेमध्ये कोणतीही ढिलाई नाही, असे लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

आयएनएस विक्रमादित्य आता देखभाल- दुरुस्तीनंतर परतली असून त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, दर तीन वर्षांनी युद्धनौका सुक्या गोदीत नेऊन नेहमी पाण्याखालीच राहणारा तळाचा भाग किंवा पाण्याखाली सातत्याने असलेल्या यंत्रणांची डागडुजी केली जाते. ती दुरुस्ती व्यवस्थित पार पडली आहे. काही यंत्रणा बदलून, नवीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्या नव्या यंत्रणांच्या क्षमता चाचण्या येत्या काही दिवसांत पार पडतील.  महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित मुंबई किनारा मार्गाचा नौदल सुरक्षेला कोणताही धोका नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, या संदर्भातील ना हरकत मंजुरी देतानाही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली असून संबंधितांशी चर्चाही करण्यात आली आहे. समुद्रात उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही किनाऱ्यापासून तुलनेने जवळ असणार आहे, त्यामुळे त्यापासून सागरी सुरक्षेचा कोणताही धोका उद्भवत नाही.

आयएनएस विक्रांत व कलावरी!

नव्याने तयार होत असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेच्या बांधणीचे दुसऱ्या टप्प्याचे कामही आता संपत आले असून तिसऱ्या टप्प्यात त्यावर असलेल्या विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात होईल. २०१८ साली ही युद्धनौका नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे, असेही लुथ्रा म्हणाले. तर आयएनएस कलावरी ही पहिलीच स्कॉर्पिन पाणबुडी असून पहिलीच असल्याने तिच्या चाचण्याही विशेष काळजी घेऊन अधिक काटेकोरपणे पार पाडल्या जात आहेत, असेही लुथ्रा म्हणाले.

पुढील वर्षी विराटची निवृत्ती

नौदलातून निवृत्त होणाऱ्या आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेसाठी किनारा लाभलेल्या राज्यांकडे विचारणा करण्यात आली आहे, त्या संदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे आले असून तिथेच निर्णय घेतला जाईल. केवळ प्रस्ताव येऊन उपयोग नाही तर तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोण, किती तयार आहे, याचाही आढावा निर्णयापूर्वी घेतला जाईल. विराट पुढील वर्षांच्या पहिल्या सहामाहीत नौदलाच्या सेवेतून निवृत होईल, असे संकेतही अ‍ॅडमिरल लुथ्रा यांनी दिले.