अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका नामवंत आणि प्रतिष्ठीत प्राध्यापकावर विद्यार्थ्यांना नोकर म्हणून राबवून घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ऐकले नाही तर व्हिसा रद्द करण्याची धमकी हा प्राध्यापक द्यायचा असे अमेरिकन वर्तमानपत्राने म्हटले आहे. अशिम मित्रा असे या प्राध्यापकाचे नाव असून मिसौरी-कान्सास विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून ते अध्यापनाचे काम करत आहेत.

घरच्या लॉनची देखभाल, कुत्र्यांचा सांभाळ तसेच घरच्या झाडांना पाणी घालायला लावणे अशी कामं ते विद्यार्थ्यांना सांगायचे असे कान्सास सिटी स्टारने आपल्या वृत्तात म्हटले आहे. वृत्तपत्राने माजी विद्यार्थी, माजी सहकाऱ्यांकडे मित्रा यांच्या वर्तनाबद्दल चौकशी केली असताना अनेकांनी या आरोपांना दुजोरा दिला. मित्रा यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

स्टुडंट व्हिसावर पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत आलेले भारतीय विद्यार्थी त्यांचे मुख्य लक्ष्य असतात. विद्यापीठात अशिम मित्रा यांचे वजन असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला विद्यापीठातून काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अशिम मित्रा यांच्याबाबतचा अनुभव सांगताना कामेश कुचीमांची हा माजी भारतीय विद्यार्थी म्हणाला कि, जेव्हा मी मित्रा यांचे आदेश मानण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला विद्यापीठातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. मित्रा सांगतात ते ऐका किंवा बाहेर पडा हे दोनच पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. रिकाम्या हाताने घरी परतणे कोणालाच आवडणार नाही असे कुचीमांचीने सांगितले.