संयुक्त अरब अमिरातीत दुबई येथे दोन भारतीयांचे अपहरण करून त्यांची मोटार व इतर मौल्यवान वस्तू चोरल्याच्या प्रकरणी तीन पाकिस्तानी व्यक्तींवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे, २०१३ मध्ये ही घटना घडली होती.
तीन पाकिस्तानी नागरिकांनी पार्किंगच्या जागेत दोन भारतीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यात त्यांची मोटार, रोख पैसे व किमती वस्तू पळवण्यात आल्या. केवळ आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या या तिघांमध्ये एजे (वय २७), केएम (वय ३१) व एएस (वय २६) यांचा समावेश असून त्यांनी भारतीयांवर हल्ला केला व १६०० डिरहॅम ( ३० हजार रुपये) हिसकावले, अर्थात ही घटना जुलै २०१३ मधील आहे.
अभियोक्क्य़ांनी या तिघा हल्लेखोरांवर अपहरण, मोटार पळवणे, हल्ला व दरोडा, शारीरिक हिंसाचार असे आरोप ठेवले आहेत. संबंधित हल्लेखोरांनी या भारतीयांना पोलिसांना खबर दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. केएम व एएस यांनी आपण कुठलाही अपराध केला नसल्याचे सांगितले. त्यांना गुरुवारी दुबई न्यायालयात हजर करण्यात आले. तुरूंग अधिकाऱ्यांनी एजे याला न्यायालयात उपस्थित केले नाही. एआर या संक्षिप्त नावाच्या भारतीयाने सांगितले की, माझा मित्र जेजे हा पार्किंगची पावती घेण्यासाठी गेला असता एका संशयिताने गाडीचे दार उघडून डोक्यात प्रहार केला व बाहेर येण्यास सांगितले. जेजे आला व त्यावेळी आणखी एका संशयिताने ढकलले. एजे याने माझी मोटार एक कि.मी चालवली. दुसरा संशयित मोटारसायकलने मागावर होता. ते निवासी भागात थांबले व आम्हाला वाहनाबाहेर काढले. पैसे वइतर मौल्यवान वस्तू, चेक बुक, सोनसाखळी घेऊन त्यांनी मोटारीसह पळ काढला.