News Flash

सरबजित हत्या खटल्याला पाकिस्तानात सुरुवात

पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात बुधवारी सरबजित सिंग हत्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. आमेर आफताब आणि मुदस्सर या दोन सहकैद्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चढविलेल्या हल्ल्यात

| January 9, 2014 12:50 pm

पाकिस्तानातील लाहोर येथील तुरुंगात बुधवारी सरबजित सिंग हत्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. आमेर आफताब आणि मुदस्सर या दोन सहकैद्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चढविलेल्या हल्ल्यात ४९ वर्षांचा सरबजित मृत्युमुखी पडला होता.
संशयित गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात सरबजित सिंग दीर्घ कारावास भोगत होता. त्याच्या सुटकेसाठी त्याच्या कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले होते, मात्र त्याच्या बदल्यात एकाही अतिरेक्याला सोडू नये, असेही त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले होते. सरबजितने पंजाब प्रांतात १९९०मध्ये घडविलेल्या स्फोटात १४ जण ठार झाल्याचा पाकिस्तानचा दावा होता. त्याच्या कुटुंबियांनी मात्र तो चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याचा व गैरमाहितीच्या आधारे पकडला गेल्याचा दावा करीत त्याच्या सुटकेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले होते. त्यांची मागणी पाकिस्तानने फेटाळली होती. मात्र २००८मध्ये सत्तेवर आलेल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’च्या सरकारने त्याची फाशी बेमुदत तहकूब केली होती. त्यानंतर हा हल्ला झाला. कैद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजितला वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले होते.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सईद अंजुम रझा यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. पोलिसांनी आफताब आणि मुदस्सर या दोघांविरोधातले आरोपपत्र दाखल केले. सरबजितने लाहोर आणि फैसलाबादमध्ये स्फोट घडविल्याच्या रागातूनच आम्ही त्याची हत्या केली, असे या दोघांनी पोलिसांना सांगितल्याचे पोलिसांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १६ जानेवारीला होणार आहे. याआधी सरबजित हत्याप्रकरणात एकसदस्यीय चौकशी आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. त्यांनी पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय कैद्यांसह ५० जणांचे जबाबही नोंदविले आहेत. लाहोरच्या ज्या कोट लखपत तुरुंगात सरबजितची हत्या झाली तेथे सध्या ३०हून अधिक भारतीय कैदी आहेत. या आयोगाचा अहवालही या न्यायालयाकडे सुपूर्द केला जाणार आहे. सरबजितची हत्या ही कटपूर्वक झाल्याचा निष्कर्ष पाकिस्तानी मानवी हक्क आयोगाने काढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 12:50 pm

Web Title: indian prisoner sarabjit singhs murder trial beings in pakistan
टॅग : Sarabjit Singh
Next Stories
1 महाराष्ट्रासाठी दमदार चेहऱ्याचा शोध
2 सर्वोच्च न्यायालयावर गांगुलींची आगपाखड
3 छत्तीसगढमधील प्रमुख नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण
Just Now!
X