भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेत व्यापारविषयक मुद्दे निकालात काढण्यावर मतैक्य झाले असताना ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा भारताला लक्ष्य केले. अमेरिकी वस्तूंवर भारतात आकारला जाणारा कर अवाजवी असून, तो अस्वीकारार्ह आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओसाका येथे २८ जून रोजी जी -२० शिखर बैठकीवेळी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी  दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारातील अडचणी सोडवण्यासाठी व्यापारमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याचे मान्य केले होते. मात्र, ट्रम्प यांनी भारतात अमेरिकी वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या कराचा मुद्दा मंगळवारी पुन्हा उपस्थित केला. भारताने आतापर्यंत अमेरिकी वस्तूंवर भरमसाठ कर लादून भरपूर फायदा वसूल केला आहे. यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ट्टिवट ट्रम्प यांनी केले आहे.या आठवडय़ात वॉशिंग्टन येथे महत्त्वाची भारतकेंद्री बैठक होत असून, त्यात अमेरिकी व्यापार मंत्री विल्बर रॉस व ऊर्जामंत्री रिक पेरी हे मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतीय कराबाबत केलेला पुनरूच्चार महत्त्वाचा मानला जातो.

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू असताना तशीच स्थिती भारत आणि अमेरिका यांच्यातही निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारताने अमेरिकेच्या एकूण २८ वस्तूंवरचे कर वाढवले असून त्यात बदाम, डाळी, अक्रोड, सफरचंद यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी भारताचा व्यापारअनुकूल देशाचा दर्जा काढून घेतल्याने आता भारताच्या वस्तूंवरील आयात करात मिळणारी सवलत रद्द झाली आहे. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने अमेरिकेच्या २८ वस्तूंवरचे कर पन्नास टक्के वाढवले होते.