भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्य समोरासमोर आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या झटापटीत भारतीय जवानांना हौतात्म्य आलं. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे. तर दुसरीकडे भारतानंच दोन वेळा घुसखोरी करत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप चीननं केला आहे.

“सोमवारी भारतीय जवानांनी अवैधरित्या सीमारेषा ओलांडून चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. तसंच दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचंही उल्लंघन केलं. यामुळे काही गंभीरित्या झटापट झाली,” अशी माहिती चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्यानं दिली आहे. “चीन आणि भारत या दोन्ही देशांनी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यास संमती दर्शवली आहे. तसेच सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मुद्द्यांवरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. आम्ही भारतासमोर आमचा विरोध दर्शवला आहे. आम्ही संबंधित कराराचं प्रामाणिकपणे पालनही  करण्यास सांगितलं आगे. तसंच भारताच्या जवानांनी सीमा ओलांडू नये,” असंही ग्लोबल टाइम्सनं परराष्ट्र मंत्र्यांचा हवाला देत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनलगतच्या सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. सध्या दोन्ही देशांत जे मतभेद आहेत, ते संवादाच्या माध्यमातून मिटतील,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. भारतीय लष्करी अकादमीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, कोअर कमांडर पातळीवर आम्ही चीनशी संवाद सुरू केला आहे. अलीकडेच बऱ्याच प्रमाणात सैन्य हलवण्यात आले असून निरंतर संवादातून उर्वरित मतभेद मिटवून हा प्रश्न सोडवला जाईल. दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार सुरू केली आहे. गलवान नदी भागात दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार घेतली असून आतापर्यंतचा सर्वात फलदायी संवाद दोन्ही देशात झाला आहे.