‘अच्छे दिन’ ही अगदी ताजी आणि भावुक संकल्पना असली, तरी जगातील महत्त्वाच्या पर्यटनव्यवहारासाठी भारत हा गेल्या काही वर्षांमध्ये  ‘अच्छे दिन’ दाखवत आहे. मौज-मजेसाठी विदेशवारी करणारे भारतीय पर्यटक हे परदेशात सर्वाधिक खर्च करतात त्याचबरोबर सहा महिने ते वर्षभर आधी आपल्या देशाटनचे नियोजन करतात, असे एका अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
आकडय़ांच्या भाषेत..
एक्सपिडिया या ट्रॅव्हलविषयक संकेतस्थळाने केलेल्या या वर्षांतील सुटीपर्यटनातील पाहणीमध्ये जगातील पर्यटकांपैकी  खरेदी व इतर खर्चिक बाबींमध्ये भारतीयांची संख्या ५२ टक्के असून, त्याखालोखाल ब्राझीलमधील पर्यटक(४५ टक्के) आहेत. उधळपट्टीत आखडता हात न घेणाऱ्यांमध्ये भारतीयांची वर्णी लागत आहे. पैकी ८५ भारतीय पर्यटक सहा महिने ते वर्षभर आधीच आपल्या सहलीचे आणि त्या अनुषंगाने खर्चाचे नियोजन करतात. याबाबत भारताने मलेशिया (८३ टक्के), थायलंड (८३)ला मागे टाकले आहे. मेक्सिकोमधील पर्यटक सहलीचे सर्वाधिक नियोजनकर्ते असून तेथील ८९ टक्के नागरिक वर्षभर आधीच देशाटनाची बेगमी करतात. जपान (५३ टक्के) नेदरलँड (५५ टक्के) या राष्ट्रांमधील पर्यटक सर्वात कमी सहलनियोजन करतात. मार्च ११ ते एप्रिल २ या काळात २४  राष्ट्रांच्या पाहणीमध्ये ही आकडेवारी हाती आली.

खर्चाचे स्वरूप
भारतीयांपैकी ४० टक्के समुद्रकिनाऱ्यांना प्राधान्य देत असल्याचे आढ़ळून आले. दोन ते पाच वर्षांनंतर देशाटनाचा आस्वाद घेणाऱ्या या पर्यटकांसमोर ४८ टक्के कर, ३४ टक्के निवासव्यवस्था, बुकिंग फी, मोबाइल पॅकेज, आरोग्यविमा, वाहतूकव्यवस्था आणि टीप्स यांमध्ये भारतीय पर्यटकांचा सर्वाधिक धनभाग खर्च होतो,

देशाटनवाढीचे कारण
उदारीकरणानंतर मध्यमवर्गाच्या अर्थप्राप्तीत झालेली वाढ आणि त्याचबरोबर पर्यटन साक्षर करणारी विविध यंत्रणा यांचा परिणाम देशाटन वाढीवर झाला. गेल्या दहा वर्षांमध्ये पर्यटन वाहिन्या, मासिके, साप्ताहिके आणि माध्यमांमधून मिळणारे ज्ञानामृत वाढत आहे.  विविध पर्यटन कंपन्यांच्या स्पर्धामुळे पॅकेज पर्यटन सोपे झाले आहे. त्यामुळे कमीत कमी दरांमध्ये भारतीयांची विदेशवारी वाढत आहे.