देशात मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ८५ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी २४ लाख ५४ हजार २५४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरुवारी ८ लाख ८१ हजार ९११ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

जगात अमेरिकानंतर भारतामध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे इस्रायलमध्ये टाळेबंदी

इस्रायलमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्याने शुक्रवारी दुपारपासून तीन आठवडय़ांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे त्यात  व्यावसायिक आस्थापनेही बंद ठेवण्यात येणार आहेत. लोकांना त्यांच्या घरापासून ०.६ मैल अंतरापर्यंत फिरण्याची परवानगी दिली आहे. यहुदी धर्मातील सुटय़ांच्या काळात लोक एकमेकांना भेटतात त्यामुळे रुग्णांची संख्या आणखी वाढू नये हा त्यामागचा हेतू आहे.