केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न दर तब्बल दोन टक्क्यांनी घटेल, असा गंभीर इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला. ते गुरूवारी राज्यसभेत नोटाबंदीवरील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारकडून ज्या अक्षम्य चुका आणि हलगर्जीपणा झाला त्याला आमचा विरोध असल्याचे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे देशातील शेती, लघुउद्योग आणि असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसेल. त्याचा विपरीत परिणाम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्त्पन्नावर (जीडीपी) होईल. देशाच्या जीडीपीत तब्बल दोन टक्क्यांची घट होईल, या विधानात कोणतीही अतिशयोक्ती नाही, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले. अनेकजण निश्चलनीकरणाचा निर्णय दीर्घकालीन विचार करता फायदेशीर असल्याचे म्हणतात. मात्र, त्यांनी आपल्या या विधानाचा फेरविचार करावा. कारण, ते ज्या दीर्घकाळाबद्दल बोलत आहेत तेव्हा आपण सगळे मेलेलो असू, अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधानांनी जनतेला भोगाव्या लागणाऱ्या या त्रासाची दखल घेतली पाहिजे. आतापर्यंत बँकांच्या रांगांमध्ये ६० ते ६५ लोकांनी जीव गमवावा लागला आहे. सरकारच्या या कृतीमुळे सामान्यांचा चलन आणि बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल. पंतप्रधान ५० दिवस त्रास सहन करा म्हणतात. मात्र, गरीबांसाठी हे ५० दिवसही जीवघेणे ठरू शकतात. पंतप्रधानांनी मला जगातील कोणताही एक देश दाखाववा, ज्याठिकाणी लोकांना बँकेत स्वत:चे पैसे भरता येतात, मात्र काढता येत नाही. पंतप्रधानांनी ठोस योजना तयार करूनच नोटाबंदीचा निर्णय घेतला पाहिजे होता, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले. यावेळी मनमोहन सिंग यांनी सहकारी बँकांच्या व्यवहारांवर बंदी घालण्याच्या निर्णयावरही टीका केली. ग्रामीण भागात अनेक ग्राहक असणाऱ्या या बँकांना कोणतेही व्यवहार करणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या हातात पैसा उरलेला नाही. त्यामुळे सरकारने या सर्व अडचणींवर व्यवहारिक तोडगा काढला पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले.