आज सकाळी तुम्ही जेव्हा हा लेख वाचत असाल तेव्हा मंगळाकडे जाणारी भारतीय मोहीम आपल्या उड्डाणाच्या तयारीत असेल. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.३८ मिनिटांनी इस्रोच्या पीएसएलव्ही सी २५ प्रक्षेपक यान मार्स ऑरबायटर यानासह श्रीहरिकोटा येथील पहिल्या लाँच पॅडवरून उड्डाण घेईल. पीएसएलव्ही म्हणजे पोलार सॅटेलाईट लाँच व्हेइकल किंवा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान. इस्रोची उपग्रहांना पृथ्वीभोवती ध्रुवीय कक्षेत स्थापित करण्यास ही पद्धत अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्यांच्या यशाची टक्केवारी ९६ आहे. हे यान वापरून मंगळ मोहिमेच्या उड्डाणाची रंगीत तालीम ३१ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. उड्डाणाच्या वेळी हे यान १३४० किलोचे वजन घेऊन पृथ्वी सोडणार आहे. ही इस्रोची पहिली आंतरग्रहीय मोहीम असणार आहे. आपण मागे बघितले होते, की मंगळाच्या दिशेने कमीत कमी खर्चात यान पाठवण्याकरिता दर सुमारे दोन वर्षांनी लाँच िवडो येते. पण हा कालखंड चुकला तर मग परत दोन वर्षे वाट बघावी लागते.
भारताच्या या मोहिमेत काही गोष्टी प्रथमच करण्यात येत आहेत. इतर देशांच्या मोहिमेसारखे यानाचे पृथ्वीवरून उड्डाण करून ते सरळ मंगळाच्या दिशेने धाव घेण्याऐवजी हे यान आपली गती वाढवण्याकरिता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करेल. हे यान २५ दिवस ध्रुवीय भागावर परिक्रमा करून आपला वेग वाढवत राहील आणि मग त्याला मंगळाच्या दिशेने पाठवण्याकरिता पुरेशी गती आली की त्याची दिशा बदलून त्याला मंगळाच्या दिशेने पाठवण्यात येईल. अशाप्रकारे यानाला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या पलीकडे पाठवण्यात इस्रोला त्यांच्या चांद्रमोहिमेत यश आले होते. या एक वेगळय़ा पद्धतीचे उदाहरण म्हणजे साखळीने गोळाफेक करणारा खेळाडू गोळय़ाला स्वत:भोवती काही वेळ फिरवून त्याला वेग देतो आणि मग एका ठराविक वेळी तो गोळा सोडतो.
या मोहिमेत मिथेनचा शोध घेणारी यंत्रणा आहे. वातावरणात मिथेन वायूचे असणे हे सजीवांच्या अस्तित्वाचे एक मोठे सूचक असू शकते. नुकतेच नासाने जाहीर केले होते, की क्युरिओसिटीला मंगळावर मिथेन सापडले नाही. पण मागे चंद्रावर पाणी नाही असेही सांगण्यात येत होते. पण भारताच्या चांद्रयानाला चंद्रावर पाणी सापडले होते. तर इस्रोच्या शास्त्रज्ञांना खात्री आहे, की या मोहिमेत नक्कीच काही नवीन शोध लागतील.  हे यंत्र मंगळाच्या वातावरणातून परावíतत झालेल्या सूर्यप्रकाशाची नोंद घेऊन त्यावरून मिथेन शोधण्याचा प्रयत्न करेल.
या यानात एकूण पाच शोध उपकरणे आहेत. मिथेन सेन्सॉर ज्याची आपण आत्ताच चर्चा केली त्याची क्षमता पीपीबी म्हणजे पार्ट पर बिलियन आहे. म्हणजे मंगळाच्या वातावरणातील एक अब्ज कणांतून तो मिथेनचे काही कण वेगळे मोजू शकतो. याची अचूकता सांगायची तर ३५० ड्रममध्ये मावेल इतक्या रसायनात जर पाण्याचा एक थेंब असेल तर तोही हा शोधू शकेल किंवा आपल्याला असेही म्हणता येईल, की अचूकता १०० वर्षांत ३ इतक्या अचूकतेने सेकंद मोजता येण्यासारखी आहे.
दुसरे उपकरण मंगळाची तीन वेगवेगळय़ा रंगांत छायाचित्रे घेऊन मग त्याचे एक रंगीत छायाचित्र तयार करेल. या यंत्राचा उपयोग मंगळाच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणातील बदलांची नोंद घेण्यास करण्यात येईल. याशिवाय हे यंत्र वापरून मंगळाच्या दोन्ही उपग्रहांची, फोबोस आणि डिमोस यांची छायाचित्रे घेण्यात येतील. तसेच हे यंत्रांच्या निरीक्षणासाठी पण पूरक ठरेल.
तिसरे यंत्र मार्स एक्झोस्फेरिक कॉम्पोझिशन एनलायझर हे १ ते ३०० आण्विक वस्तुमान एककामध्ये वेगवेगळय़ा उंचीवर पदार्थाच्या घटकांचा शोध घेईल. लायमन अल्फा फोटोमीटर हे उपकरण मंगळाच्या वरच्या वातावरणात हायड्रोजन आणि डय़ुटॅरियमच्या प्रमाणाची नोंद घेईल. या उपकरणामुळे मुख्यत: आपल्याला मंगळाच्या वातावरणातून पाण्याचा ऱ्हास होण्याबद्दल माहिती मिळेल.
थर्मल इंफ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर हे यंत्र मंगळावरून येणाऱ्या उष्म्याची नोंद घेईल.  अनेक प्रकारच्या खनिजांचे आणि मातीच्या प्रकारांचे उष्मा उत्सर्जति करण्याचे काही गुणधर्म असतात. त्यावरून त्यांच्या घटकांची माहिती मिळू शकेल.
ही पाचही यंत्रे घेऊन यान पुढच्या वर्षी सुमारे ३०० दिवसांचा प्रवास करून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मंगळाजवळ पोहोचेल. जर सर्व ठरल्याप्रमाणे घडले तर २१ सप्टेंबर रोजी याला मंगळाच्या कक्षेत स्थापित करण्याची योजना आहे. ही एक अत्यंत अवघड आणि जटिल प्रणाली असणार आहे. इथे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे, की त्या अंतरावरून संदेश येण्याकरिता किंवा पाठवण्यास जवळजवळ २० मिनिटे लागतील. तेव्हा या यानाला स्वत:चे निर्णय घेता यावेत म्हणून ६८ वेगवेगळे संगणक आज्ञावली (प्रोग्राम) लिहिण्यात आले आहेत. एकदा का हे यान मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले की मग ते एक दीर्घवर्तुळाकार कक्षेत मंगळाची परिक्रमा करेल. या कक्षेत यान मंगळाच्या पृष्ठभागापासून फक्त ३६३ कि.मी. अंतरावरून जाईल, तर याचे जास्तीत जास्त अंतर ८०००० कि.मी. असेल. याचे आयुष्यमान ६ महिने असेल.
मोहिमेची किंमत ४५० कोटी रुपये आहे. तसेच भारताच्या या मोहिमेस इतर देशांच्या मोहिमांपेक्षा खूप कमी खर्च लागला आहे. आपल्या देशाला अशी किंमत परवडेल का?  कदाचित यावर तुम्हाला उलटसुलट चर्चा ऐकायलाही मिळतील, पण हा आपला इथला विषय नव्हे. आपल्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे पृथ्वीवरील जवळजवळ २०० राष्ट्रांत फक्त हातांच्या बोटांवर मोजण्याइतके देश आहेत, ज्यांनी ही मंगळ भरारी घेण्याचे स्वप्न बघून ते साकार करण्याचे प्रयत्न केले आहेत.