पाटण्यातल्या विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी विमान उड्डाण करणार इतक्यात, त्याच्या इंजिनाला आग लागली. वैमानिकाने विमान रोखलं आणि लोकांना तातडीने उतरा अशा सूचना केल्या. लोक जीव मुठीत घेऊन अक्षरशः जीव मुठीत घेऊन उड्या मारून विमानातून उतरू लागले, सगळीकडे या घटनेमुळे एकच गोंधळ माजला. अनेक प्रवासी जखमीही झाले.

विमान पाटण्याहून दिल्लीला जात होतं. या विमानात १७४ प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी बसले होते. विमान सुरू झालं, धावपट्टीवरून धावू लागलं आणि उड्डाण करणार इतक्यात अचानक विमानाच्या इंजिनाला आग लागली. हे विमान डगमगू लागलं. मग प्रवासी चांगलेच घाबरले, त्यानंतर लगेचच वैमानिकाने घोषणा केली, पळा पळा विमानाच्या इंजिनाला आग लागली आहे, आधीच घाबरलेले प्रवासी चांगलेच गोंधळले, जीव वाचवण्यासाठी ते एकमेकांच्या अंगावरून उड्या मारून खाली उतरू लागले. या सगळ्या गोंधळात अनेक प्रवासी जखमी झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.

या विमानाचा टायर फुटला अशी बातमी आधी आली होती, मात्र विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे इंडिगो व्यवस्थापनाने सांगितले. अचानक झालेल्या या अपघातामुळे ८.३० वाजेपर्यंत कोणतंच विमान या धावपट्टीवरून उडालं नाही. या प्रकरणात चूक कोणाची होती? याची चौकशी सुरू झाली असल्याचेही इंडिगो प्रशासनाने सांगितले आहे.

या अपघातामुळे भाजपचे नेते सुशील मोदी, केंद्रीय मंत्री रामकृपाल यदाव यांच्यासमवेत काही खासदार आणि नेते यांना दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर अडकून राहावं लागलं. जीएसटीच्या समारंभात या नेत्यांना हजर व्हायचं होतं पण विमानाला आग लागल्यानं त्यांना वाट बघावी लागली. आता हे विमान धावपट्टीवरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.