इंडोनेशियातील आकस्मिक पूर आणि भूस्खलन यात मरण पावलेल्यांची संख्या ३५ वर पोहोचली असून २५ लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर १४ जण जखमी झाले आहेत. उद्ध्वस्त झालेल्या खेडय़ांमध्ये लोक जिवंत सापडण्याच्या आशेने शोधमोहिमेचे कर्मचारी कोपरान्कोपरा तपासत आहेत.

मध्य जावामध्ये हजारो घरे पाण्यात बुडाली असून सततचा पाऊस व सर्वत्र पसरलेला पूर यामुळे १९ लोक बेपत्ता आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. वाहने रस्त्यांखाली वाहून गेली, तर चिखल, दगड आणि पाणी यांच्या वेगाने वाहणाऱ्या भिंतींमुळे कित्येक घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

बेपत्ता झाल्याची शंका असलेल्या सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर बळींची संख्या वाढल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रवक्ते सुतोपो पूवरे नुग्रोहो यांनी दिली. आतापर्यंत आम्ही ३१ मृतदेह शोधले असून १९ लोक अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती त्यांनी वृत्तसंस्थेला दिली. बंजारनेगरा येथे चिखलाच्या लोटामुळे सहा जण मारले गेले.