जकार्ता : इंडोनेशियाच्या पाणबुडय़ांना (डायव्हर्स) अपघातग्रस्त विमानाच्या सांगाडय़ाचे काही भाग सापडले आहेत. २३ मीटर म्हणजे अंदाजे ७५ फूट खोलीवर जावाच्या सागरात विमानाच्या सांगाडय़ाचे भाग सापडले असून ६२ प्रवासी असलेले हे विमान जकार्ता येथून उड्डाणानंतर लगेच कोसळले होते.

एअर चीफ मार्शल हादी तजा हिन्तो यांनी सांगितले, की पाणबुडय़ांना विमानाचे काही भाग सापडले आहेत, पाण्यातील सगळे काही स्वच्छ दिसत असल्याने सांगाडय़ाचे भाग शोधणे सोपे गेले. बहुदा याच ठिकाणी ते विमान सागरात कोसळले. विमानाच्या नोंदणीकरणाची पट्टीही सापडली असून काही मृतदेह व कपडे तसेच विमानातील धातूच्या पट्टय़ा बाहेर काढण्यात आल्या आहेत.

श्रीविजया एअर फ्लाइट १८२ हे विमान कुठे पडले आहे, हे नौदलातील ‘सोनार’ यंत्राच्या मदतीने शोधण्यात यश आले. शनिवारी दुपारी उड्डाणानंतर हे विमान बेपत्ता झाले होते. अपघात नेमका कशामुळे झाला असावा हे अजून स्पष्ट झालेले नाही. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधला होता त्या वेळी विमान २९ हजार फूट उंचीवर होते. विमानात ६२ प्रवासी होते. त्यात सात बालके व तीन बाळांचा समावेश होता.

अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले की, या अपघातात मरण पावलेल्या सर्वाना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. जिवंत असलेल्यांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समिती काम करीत आहे.

लांकांग व लाकी बेटांच्या दरम्यान काम करणाऱ्या मच्छीमारांनी हे विमान दुपारी २.३० वाजता सागरात कोसळताना पाहिले होते. स्फोटासारखा मोठा आवाज आला. पाणी मोठय़ा प्रमाणावर हलत होते असे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या सोलिहिन यांनी सांगितले. या भागात पाऊस सुरू असून हवामान खराब आहे. त्यामुळे विमानाचा सांगाडा सापडणे अवघड काम होते पण त्याचे काही भाग सापडले आहेत.

बोईंग कंपनीने म्हटले आहे की, जे प्रवासी यात मरण पावले त्यांच्या नातेवाइकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. विमानतळ व विमान कोसळले त्या बंदराच्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

हे विमान २६ वर्षे जुने होते. आधी ते अमेरिकेतील हवाई कंपन्यांनी वापरलेले होते व वाहतुकीस योग्य होते. हे विमान आधी त्याच दिवशी पाँटियानक ते पांगकल हा प्रवास करून आले होते. निगा व दुरुस्तीचा अहवालही योग्य आहे. खराब हवामानामुळे विमानाला उशीर झाला होता. विमानात दोष नव्हता.

 – जेफरसन इरविन जॉवेना, श्रीविजया एअरचे अध्यक्ष व   संचालक

मोदींकडून शोक

नवी दिल्ली : इंडोनेशियातील विमान अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शोकसंवेदना व्यक्त केली. ‘इंडोनेशियातील दुर्दैवी विमान अपघातात ज्यांचे बळी गेले, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी शोक संवेदना व्यक्त करतो. या दु:खद घडीला आम्ही त्या देशासोबत आहोत’, असे मोदी यांनी ट्विटरवर लिहिले.