कमकुवत अर्थव्यवस्थेचा फटका ऐन दिवाळीपूर्वीच्या महिन्यातही बसला आहे. सप्टेंबरमधील देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक गेल्या सात वर्षांच्या तळात विसावला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी, भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच जाहीर केलेल्या देशाच्या औद्योगिक स्थितीबाबत चिंताजनक स्थिती कायम असल्याचे स्पष्ट झाले.

निर्मिती, कोळसा व पोलाद उत्पादन तसेच ऊर्जा क्षेत्रातील कमी निर्मितीमुळे सप्टेंबरमधील देशातील औद्योगिक उत्पादन ४.३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. यापूर्वी एप्रिल २०१२ मध्ये, सात वर्षांपूर्वी औद्योगिक उत्पादन दर ०.७ अशा किमान स्तरावर होता. तर वर्षभरापूर्वी, सप्टेंबर २०१८ मध्ये हा दर ४.६ टक्के होता.

गेल्या महिन्यात निर्मिती क्षेत्राचा प्रवास ३.९ टक्क्य़ांपर्यंत घसरता राहिला आहे. वर्षभरापूर्वी तो ४.८ टक्के होता. तर ऊर्जानिर्मिती सप्टेंबर २०१८ मधील ८.२ टक्क्य़ांच्या तुलनेत यंदा २.६ टक्क्य़ांपर्यंत येऊन ठेपली आहे. कोळसा व पोलाद उत्पादन ८.५ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहे. भांडवली वस्तू उत्पादन ६.९ टक्क्य़ांच्या तुलनेत थेट २०.७ टक्क्य़ांनी रोडावले आहे.

प्रमुख औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील एकूण २३ पैकी १७ क्षेत्रांची कामगिरी नकारात्मक राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत देशाचा औद्योगिक उत्पादन दर १.३ टक्के असा राहिला आहे. वर्षभरापूर्वी, याच दरम्यान तो ४.८ टक्के होता. देशाच्या विकास दराने गेल्या सहा वर्षांतील ५ टक्के असा सुमार तळ नोंदविला असतानाच निर्मिती, उद्योग अद्याप मंदीतून बाहेर निघालेले नाहीत.