01 March 2021

News Flash

महागाईत तेल!

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तर आठवड्यात चार वेळा वाढ झाली.

आठवड्यात चौथी इंधन दरवाढ; लवकरच इतर वस्तू-सेवांवर परिणाम

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आठवड्यातील चौथी तर महिन्यातील विसावी दरवाढ झाल्यामुळे सध्या वाहनधारकांच्या खर्चात दररोज वाढ होत आहे. तर या इंधन दरवाढीचा परिणाम येत्या काळात वस्तू-सेवांच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे शेतमालापासून सर्वच गोष्टी महाग होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तर आठवड्यात चार वेळा वाढ झाली. ही एकूण वाढ लक्षात घेता, या आठवड्यात पेट्रोल व डिझेलचे दर १ रुपयाने वाढले. शेतकरी, मालवाहतूकदार आणि उद्योजकांना या इंधन दरवाढीची झळ सध्या मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. इंधन दरवाढीचा भुर्दंड येत्या काही काळात सामान्य नागरिकांना सोसावा लागण्याची चिन्हे आहेत.

सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात घट केल्यामुळेच किमती वाढल्याचे पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते; मात्र करकपात करण्याबाबत त्यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हते.

तेलाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च २०२०मध्ये तेलाच्या उत्पादनात दररोज १० लाख बॅरल्सची अतिरिक्त स्वैच्छिक कपात करण्याचे जाहीर केले. यामुळे, करोना महासाथ सुरू झाल्यापासून तेलाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले.  स्थानिक विक्रीकर किंवा मूल्यवर्धित  कर (व्हॅट) यांच्या आधारे  इंधनाचे दर प्रत्येक राज्यात  वेगवेगळे  असतात. सध्या हे देशातील इंधनाचे विक्रमी दर आहेत. त्यामुळे ग्राहकांवरील बोजा कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे.

या महिन्यात झालेल्या दरवाढीमुळे दरांनी विक्रमी पातळी गाठण्यापूर्वी, ४ ऑक्टोबर २०१८ रोजी इंधनाच्या दरांचा उच्चांक गाठला गेला होता. त्या वेळी सरकारने चलनफुगवट्याचा दबाव कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे दीड रुपयांची कपात केली होती. त्यासोबतच, सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांनी हे दर लिटरला १ रुपयाने आणखी कमी केले, मात्र नंतर ते पुन्हा बहाल केले होते. या वेळी मात्र अशा प्रकारे करकपात होण्याचे कुठलेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत.

 

शंभरीनजीक…

गेल्या वर्षी तसेच २०१९ मध्ये पेट्रोल ८० रुपये दराने मिळत होते. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले पेट्रोलचे दर पाहता लवकरच मुंबईसह इतरत्र पेट्रोलचा दर १०० रुपये होईल, असा अंदाज आहे.

 

अवघ्या सतरा दिवसांत…

सुमारे महिनाभराच्या खंडानंतर, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी तेल कंपन्यांनी ६ जानेवारीपासून दरांचे दैनंदिन पुनर्निर्धारण पुन्हा सुरू केले. तेव्हापासून पेट्रोलचे दर लिटरमागे १.९९ रुपयांनी तर डिझेलचे दर लिटरला २.०१ रुपयांनी वाढले आहेत.

 

नवा उच्चांक…

पेट्रोल-डिझेलच्या दरात शनिवारी लिटरमागे २५ पैशांनी वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर लिटरला ९२.२८ रुपये, तर दिल्लीत लिटरला ८७.५० रुपये झाले. डिझेलचे दर मुंबईत लिटरला ८२.६६ रुपये, तर दिल्लीत ७५.८८ रुपयांवर पोहोचले.

सध्या बाजारात भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास येत्या काळात शेतमालाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.  – भगवान तुपे, भाजी व्यापारी

कंपन्यांकडून जो दर मालवाहतूकदारांना दिला जातो. त्यातील ६० टक्के रक्कम ही डिझेलमध्येच खर्च होते. इंधनाच्या किमतीत अशीच वाढ होत राहिली तर, या क्षेत्रात निगडित असलेल्या सर्वांवर त्याचा परिणाम होईल. येत्या काही दिवसांत देशभरातील सर्वच मालवाहतूकदार संघटनांशी ऑनलाइन बैठक होणार असून त्यानंतर मालवाहतुकीच्या दरांबाबत धोरण ठरविले जाईल.  – महेंद्र आर्या, राष्ट्रीय अध्यक्ष,  ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन.

इंधन दरवाढीमुळे उत्पादनाच्या किमतीतही वाढ होते. ज्या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. तेथे उद्योजकांना डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवावा लागतो. तसेच मालवाहतूकदारांनी वाहतुकीच्या दरात वाढ केल्यास वस्तूच्या किमतीत वाढ होईल. त्याचा परिणाम ग्राहकांना सहन करावा लागेल. – भावेश मारू, सचिव, ठाणे व्यापारोद्योग महासंघ

मालवाहतूकदारांनी अद्यापही वाहतूक खर्चामध्ये दरवाढ केली नाही. ती दरवाढ झाल्यास त्याचा परिणाम उद्योजकांना बसेल. सरकारने इंधनाचे दर वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणावेत. देशातील सर्व राज्यांचे इंधनदरही एकसमान असावेत. – एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 1:53 am

Web Title: inflation oil fuel price hike rates of petrol and diesel akp 94
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा
2 करोनाचा नवा विषाणू अधिक घातक
3 केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त
Just Now!
X