भारतातील धवलक्रांतीचे पितामह डॉ. व्हर्गिस कुरियन यांची आज ९८ वी पुण्यतिथी. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात व्हर्गिस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात  कुरियन यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…

  • केरळातल्या आताच्या कोझिकोड येथे अल्पसंख्य अशा सीरियन ख्रिश्चन कुरियन कुटुंबात जन्माला आलेल्या व्हर्गिस याने देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा एक स्वप्न पाहिले व पुढे आयुष्यभर त्या स्वप्नाच्या परिपूर्तीचा ध्यास घेतला. त्यातूनच आकाराला आली अशिक्षित, मातृभाषेतच शिकलेला, उच्चशिक्षणापासून दुरावलेला भारत काय करू शकतो याची एक अद्वितीय अमूल प्रेमकहाणी; जिने पुढे शहरांपुरतेच मिरवणाऱ्या, उगाचच आंग्लाळलेल्या इंडियालाही झाकोळून टाकले.
  • कुरियन मुळात अभियांत्रिकीचे विद्यार्थी. त्यातील पदवी घेतली त्यांनी आताच्या चेन्नईमध्ये. नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले जमशेदपूरला, टाटा यांच्या पोलाद संशोधन संस्थेत. तिथून त्यांनी उड्डाण केले ते थेट अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात. परदेशात गेल्यावर डॉलरप्रेमात आकंठ बुडून जगणे सार्थक मानायचा काळ अजून यायचा होता त्या वेळी. हा अध्ययनयज्ञ पूर्ण होत असताना इकडे १५ ऑगस्ट उजाडलेले होते आणि स्वतंत्र भारतात उजाडलेला सूर्य प्रतिभावंतांना खुणावू लागला होता. कुरियन परत आले ते थेट केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होण्यासाठीच.
  • कुरियन भारतात परतले तोपर्यंत आणंद येथील दुग्धसंस्था जन्माला येऊन स्थिरावलेली होती. कुरियन यांनी या संस्थेला आकार दिला. सुरुवातीपासूनच तो इतका डोळ्यात भरणारा होता की अमूल या पुढे देशाचा अत्यंत लाडका झालेल्या- ब्रँडच्या पहिल्या कारखान्याच्या उद्घाटनास अशा अनेक संस्थांची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. देशी उत्पादने, संकल्पना याकडे पाहून नाके मुरडणारा वर्ग त्याही वेळी होता. त्यामुळे अमूल या संस्कृतातील अमूल्यवरून बारसे झालेल्या ब्रँडचे काही खरे नाही, ही धारणा सर्वाचीच होती. जगात दुग्धजन्य पदार्थात काही कोणी करू शकत असेल तर ती फक्त नेस्ले ही स्विस कंपनीच असे मानणारे निवासी अभारतीय तेव्हाही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे सुरुवातीला जसे आपल्याकडे कोणत्याही नव्या संकल्पनेस विरोधाला सामोरे जावे लागते, तसेच अमूल या ब्रँडचेही झाले.
  • व्हर्गिस कुरियन यांना दूध अजिबात आवडत नसे. दूध मला आवडत नाही आणि त्यामुळे ते मी पीत नाही, इतक्या प्रामाणिकपणे कुरियन आपले मत नोंदवीत. पण म्हणून दूध पूर्णान्नाच्या जवळ जाणारे आहे, हे ते नाकारत नसत.
  • दुधाला भारतीय संस्कृतीत, समाजजीवनात विलक्षण महत्त्व आहे आणि त्यास योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर देशातील कोटय़वधी ग्रामीण महिलांना स्थिर रोजगाराचे कायमस्वरूपी माध्यम उपलब्ध होईल याची डोळस जाण त्यांना होती.
  • भारतात कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी देशात रोजगाराचे मुख्य साधन हे कृषीविषयक उद्योग हेच असणार आहेत आणि १८ ते ५५ या वयोगटात असणाऱ्या कोटय़वधी महिलांना दुग्धजन्य पदार्थाचा व्यवसाय हा उपजीविकेचा स्वयंपूर्ण मार्ग असणार आहे, असा त्यांचा सिद्धांत होता. याच डोळस अभ्यासाने कुरियन यांना आयुष्यभराचे श्रेयस आणि प्रेयस मिळवून दिले.
  • १९४६ साली शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कुरियन यांनी पहिल्यांदा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि गुजरातेतील आणंद जिल्ह्य़ात पहिल्यांदा सहकारी क्षेत्रातला दूध प्रकल्प जन्माला आला.
  • ४ जानेवारी १९४६ या दिवशी गुजरातेतील समरखा सहकारी संस्थासंदर्भात एक बैठक भरवण्यात आली. या बैठकीची सूत्रे होती मोरारजी देसाई यांच्याकडे. मोरारजीभाई यांना या बैठकीची सूचना केली होती सरदार पटेल यांनी आणि या सगळ्यात तीनच वर्षांनी सामील झाला केरळातील अवघ्या २५ वर्ष वय असणारे व्हर्गिस कुरियन.
  • त्या बैठकीत सर्व उपस्थितांनी मिळून एक निर्णय घेतला. दूधासाठी सहकारी संस्था स्थापन करायची आणि त्या परिसरातील दूध थेट बाँबे मिल्क स्कीमला पोहोचवायचे. त्याच वर्षी १९४६ सालातील १४ डिसेंबर या दिवशी आणंद या सहकारी संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला या सहकारी संस्थेतून दूध विकत घ्यायला सरकारचाच विरोध होता आणि या सहकारी संस्थेच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण केले जात होते.
  • कुरियन यांचे मोठेपण हे की या क्षेत्रातील युरोपीय संकल्पना त्यांनी बाजूला ठेवल्या. युरोपात आणि पाश्चात्त्य जगतात गायीच्या दुधाला महत्त्व असते आणि त्याचीच भुकटी करून विविध उत्पादने तयार केली जातात. भारतात गोमातेऐवजी महिषकन्येचे दूध वापरायला हवे, हे कुरियन यांना सुचले.
  • भारतात म्हशी मोठय़ा प्रमाणावर असतात तेव्हा त्यांच्याच दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने तयार व्हायला हवीत हा कुरियन यांचा विचार. तो त्यांनी सत्यात आणला. त्याच्या यशाबाबत कुरियन यांना एवढा विश्वास होता की सहकारी दूध संघ जन्माला आल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी अमूल ब्रँडची निर्मिती झालीदेखील.
  • या कामाची महती इतकी होती की पंडित नेहरूंच्या नंतर पंतप्रधानपदी आलेले लाल बहादूर शास्त्री यांनी त्याच्या प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणाच जन्माला घातली आणि त्याची संपूर्ण सूत्रे कुरियन यांच्या हाती दिली.
  • ज्या देशात एकेकाळी सणासुदीला गोडधोड खाण्यासाठी दुधाची आगाऊ नोंदणी केल्याशिवाय ते मिळत नसे त्या देशात दुधाचा महापूर वाहू लागला. ज्या देशातील हजारो बालकांना केवळ उपलब्धते अभावी दूध पाहायलाही मिळत नसे त्या देशात हवे तितके हवे तेव्हा आणि हवे तिथे दूध मिळू लागले. या श्रेयाचे एकमुखी धनी हे कुरियन.
  • यश मिळवणे आणि यश राखणे यांत तफावत असते. याची जाणीव कुरियन यांना होती. त्यामुळे प्रचंड प्रसार होऊनही अमूलचा दर्जा घसरला नाही. मर्यादित आकारात उत्तम काम करता येते. परंतु आकारही वाढवायचा व दर्जाही राखायचा ही तारेवरची कसरत कुरियन यांनी अगदी यशस्वीपणे पार पाडली.
  • दर्जात कोणतीही तडजोड न करता, रास्त दरात ग्राहकांना उत्पादन देताना ती निर्मिणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरेसा मोबदला देता येऊ शकतो हे अमूलने दाखवले.
  • स्वातंत्र्यपूर्व काळातील असूनही कुरियन आधुनिक होते. त्यामुळे अमूल उत्पादनांच्या जाहिराती आणि विपणन व्यवस्था याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही.
  • अमूलचे वर्णन ‘टेस्ट ऑफ इंडिया’ असे झाले ते कुरियन यांना या विषयात रुची होती आणि या आधुनिक वाटणाऱ्या विषयांची चव होती म्हणूनच. त्यामुळेच जागतिकीकरणानंतर भारतीय बाजारात प्रचंड ताकदीचे डेनॉन आदी आंतरराष्ट्रीय ब्रँड येऊनही अमूलने आपले स्थान गमावले नाही.
  • कुरियन यांनी अमूलला अशा उंचीवर नेऊन ठेवले की, ‘भारताला एक नाही, तर अनेक अमूलची गरज आहे’, असे लाल बहादूर शास्त्री यांनी एकदा अमूलची स्तृती करताना म्हटले होते.
  • खंत इतकीच की २००६ साली कुरियन यांना आपल्याच संस्थेतून अपमानित होऊन जावे लागले. निर्मात्याने आपल्या कृतीपासून योग्य वेळी दूर व्हायचे असते, निर्मितीस निर्मात्याची गरज नसते, हे तत्त्व कुरियन विसरले आणि त्यांच्या साधनेचा असा विचित्र अंत झाला.
  • असले असले तरीही गुजरात आणि आसमंतातही लाखो महिला, शेतकरी यांच्या जगण्यामागील ताठ कण्याचा आधार कुरियन होते हे विसरता येणार नाही.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?