नवी दिल्ली : भाजपला प्रामुख्याने राजस्थानमध्ये अंतर्गत मतभेदाचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशात तुलनेत भाजपमध्ये गटबाजीचे प्रमाण नियंत्रणात राहिले होते पण, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या काही व्यक्तव्यांमुळे भाजप नेत्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद असल्याचे तिकीटवाटपाआधीच स्पष्ट झाले होते. राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाला नेमायचे यावरूनही केंद्रीय नेतृत्व आणि वसुंधरा राजे यांच्यात एकमत न झाल्याने बराच काळ हे पद रिकामे ठेवावे लागले होते.

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील अशोक गेहलोत आणि सचिन पायलट गटांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू होती. पण, ती आवाक्यात ठेवण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यश आले होते. या तुलनेत वसुंधराच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे पक्षांतर्गत टीका सहन करावी लागली होती.

मध्य प्रदेशमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये अधिक गटबाजी होती. ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय यांच्यातील जाहीर वादानंतर ही गटबाजी चव्हाटय़ावर आली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना इतकी उघड स्पर्धा कुणाचीही नव्हती. मात्र, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील सुधारणांचे त्यांनी उघडपणे समर्थन केले.