News Flash

‘आप’मध्ये यादवी!

आम आदमी पक्षात (आप) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षांला रोज नवीन कलाटणी मिळत असून, शनिवारी पक्षाच्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतील काही नेत्यांनी

| March 8, 2015 02:37 am

आम आदमी पक्षात (आप) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षांला रोज नवीन कलाटणी मिळत असून, शनिवारी पक्षाच्या महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूतील काही नेत्यांनी उलट-सुलट विधाने करून पक्षातील अ‘भूषणा’वह ‘यादवी’ला पुन्हा तोंड फोडले. आपच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजनी दमानिया यांनी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव व्हावा अशी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांचीच इच्छा होती, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली, तर पक्ष ताब्यात घेण्याचा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांचा अंतस्थ हेतू होता असा आरोप तमिळनाडूतील एका नेत्याने केला. दुसरीकडे आपचे top02नेते मयंक गांधी यांनी पक्षातील निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेला एक गट आपणांस लक्ष्य करीत असल्याचे सांगत थेट राजीनाम्याचाच इशारा दिला.
बाह्य़ व्यासपीठांवरून पक्षनेत्यांनी पक्षांतर्गत वादांची चर्चा करू नये असा आदेश असतानाही तो धाब्यावर बसवून मयंक गांधी यांनी एका ब्लॉग लेखातून आपमधील आशीष खेतान आणि अन्य काही नेत्यांवर तोफ डागली.  आपच्या राजकीय व्यवहार समितीमधून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यास आपण ठाम विरोध केला. त्यामुळे आता आपल्याला एका गटाकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सक्तीनेच आपल्याला पक्ष सोडावा लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी प्रशांत भूषण यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा थेट आरोप केला. त्या म्हणाल्या, प्रशांत भूषण हे पक्षाचा प्रचार करीत नाहीत असे आपणांस समजले तेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊन सर्व मतभेद दूर ठेवा असे सांगितले. त्यावेळी, या निवडणुकीत पराभव होणे ‘आप’साठी गरजेचे आहे, असे भूषण म्हणाले, तेव्हा आपल्याला धक्काच बसला. दिल्लीच्या निवडणुकीत आपला २०-२२ पर्यंतच जागा मिळाल्या म्हणजे मग राष्ट्रीय निमंत्रकपदी योगेंद्र यादव यांची नियुक्ती करता येईल, अशी प्रशांत भूषण यांची योजना होती, असा आरोपही त्यांनी केला.
या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात तमिळनाडूतील आपचे नेते एम. लेनिन यांनीही आपली तोफ डागली. आपल्या समर्थकांना राज्याचे नेते म्हणून घोषित करून भूषण आणि यादव यांना पक्षात आपला गट तयार करावयाचा होता, असा आरोप त्यांनी केला.
स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाची अपेक्षा करणारी जनता सध्या ‘आप’मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे संभ्रमात पडली आहे, अशी टीका यावर अण्णा चमूचे माजी सदस्य मुफ्ती कासीम यांनी केली.

काही असंतुष्टांनी आपल्याविरोधात मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे. काही जुनी प्रकरणे उकरून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपण पक्ष सोडावा इतका पाणउतारा केला जाईल. यादव आणि भूषण यांच्या बाबतही तशीच योजना होती.
– मयंक गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रशांत भूषण प्रचार करीत नव्हते. तेव्हा त्यांची भेट घेतली असता पक्षाचा पराभव होणे ‘आप’साठी गरजेचे आहे, असे भूषण यांनी आपणांस सांगितले, तेव्हा मला धक्काच बसला.
– अंजली दमानिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 2:37 am

Web Title: internal shakedowns in aap
Next Stories
1 प्रणव मुखर्जींमुळे काँग्रेसचा पराभव – चिदंबरम
2 काश्मीरात राजकीय कैद्यांची सुटका
3 ‘आंध्र’ला विशेष पॅकेजची मागणी
Just Now!
X