भारत विरोधी दहशतवादी कारवायांची सूत्रे कराचीमधून हलवली जातात असा अहवाल एका ब्रुसेलच्या संशोधन संस्थेनी दिला आहे. ‘पाकिस्तानः स्टोकिंग द फायर इन कराची’ या नावाने इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने अहवाल प्रसिद्ध केला आहे.  सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा असून देखील कराचीमध्ये दहशतवादी कारवायांचे कट कसे रचले जातात याचा उलगडा या अहवालात करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैय्यबा आणि जैश ए मोहम्मद सारखे दहशतवादी गट येथील मदरशांसोबत संलग्न आहेत. या गटांना पाकिस्तानी लष्कराचा वरदहस्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कराचीमध्ये या संस्था राजरोसपणे आपले काम करतात. पाकिस्तानचे सरकार त्यांच्या कारवायांकडे कानाडोळा करते.

त्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये चांगला जिहादी आणि वाईट जिहादी असे जिहाद्यांचे दोन प्रकार समजले जातात. लष्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद हे या दोन्ही संघटना चांगले जिहादी या प्रकारात मोडतात. त्यामुळे ते काय करत आहेत याकडे दुर्लक्ष केले जाते असे या अहवालात म्हटले आहे.  भारताविरोधात कराचीमध्ये काही कट शिजतोय असे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येते, त्यावेळी देखील या यंत्रणा निष्क्रिय राहतात. भारत-पाकिस्तानातील तणावातून निर्माण झालेला मुद्दा म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते.

एकेकाळी समृद्ध असणाऱ्या कराची शहराची कशी वाताहत झाली आहे, याबाबत या अहवालात लिहिण्यात आले आहे. भ्रष्टाचार, काळ्या पैशांची समांतर अर्थव्यवस्था, वांशिक तेढ, टोळीयुद्ध, दहशतवाद्यांचे जाळे या सर्व तणावांमुळे कराची या शहराची अवस्था प्रेशर कुकरसारखी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. शहरामध्ये अनेक टोळ्या कार्यरत आहेत. त्या टोळ्यांमध्ये नेहमी तणाव असतो आणि त्यातून हिंसाचार उसळतो असे या अहवालामध्ये म्हटले आहे. पूर्ण कराचीमध्ये जमिनीची अवैध विक्री होते किंवा ती बळजबरीने हस्तगत करता येते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. लष्कराचा कारभार मनमानी पद्धतीचा असून ते विशिष्ट पंथांच्या लोकांविरुद्धच ते कारवाई करतात. इतरांना पूर्णपणे मोकळीक दिली जाते, असे या अहवालात म्हटले आहे. सरकारने वेळीच स्थितीवर नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.