लष्कर, गुप्तचर व रेंजर्स अधिकारी यांची संयुक्त मोहीम
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात तालिबानी आत्मघाती हल्लेखोरांनी रविवारी एका उद्यानात केलेल्या बॉम्बस्फोटात ७२ जण ठार झाल्यानंतर आज विविध ठिकाणी छापे टाकून अनेकांना अटक करण्यात आली आहे. पंजाब प्रांतात या स्फोटातील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी लष्कराने मोहीम सुरू केली आहे.
लष्कर, गुप्तचर व रेंजर्स अधिकारी यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत आत्मघाती स्फोटाचा तपास करण्यात येत आहे. रविवारी तेथील उद्यानात झालेल्या भीषण स्फोटात महिला व मुलांसह ७२ जणांचा बळी गेला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल असीम बाजवा यांनी सांगितले की, अनेक संशयित दहशतवादी व त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली. लाहोर, फैसलाबाद, मुलतान या तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. पंजाब प्रांताच्या दक्षिण भागात दहशतवाद्यांचे अड्डे असून तेथे लष्करी कारवाई करण्याची मागणी बऱ्याचा काळापासून होती.
पंतप्रधान नवाझ शरीफ व लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी उच्चस्तरीय पातळीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. लाहोरमध्ये झालेल्या या स्फोटातील आत्मघाती अतिरेकी दक्षिण पंजाबमधील मुझफ्फरगड येथील रहिवासी असलेल्या गुलाम फरीद यांचा मुलगा युसूफ हा होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. तो २०-२५ वयादरम्यानचा होता. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कायदा अंमलबजावणी संस्था व गुप्तचर संस्थांनी परिस्थितीची माहिती दिली. शरीफ यांनी सांगितले की, दहशतवादी व त्यांना मदत करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात येईल. दहशतवादाविरोधातील युद्ध आम्हीजिंकू. भ्याड अतिरेक्यांनी महिला व मुलांना लक्ष्य केले, त्याचा मी निषेध करतो.