काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे पी चिदंबरम यांचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे.

विशेष न्यायमूर्ती अजय कुमार यांनी चिदंबरम यांची वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी यावेळी दिली. सीबीयआने न्यायालयीन कोठडीत वाढ कऱण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने कोठडीत वाढ केली. सीबीआयची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाकडे कोठडीत वाढ कऱण्याची मागणी करताना कारागृहात पाठवलेल्या पहिल्या दिवसापासून अद्याप काहीच बदल झाला नसल्याचं सांगितलं.

चिदंबरम यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या मागणीला विरोध दर्शवला. कपिल सिब्बल यांनी याचिका करत चिदंबरम तिहार जेलमध्ये असेपर्यंत रोज वैद्यकीय तपासणी करण्याची तसंच पुरेसा पूरक आहार दिला जावा अशी मागणी केली. चिदंबरम अनेक आजारांनी त्रस्त असून, कोठडीत असताना त्यांच्या वजनात घट झालं असल्याचं यावेळी त्यांनी न्यायालयात सांगितलं.