इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ मोहसीन फाखरीझादेह यांची मागच्या आठवडयात हत्या करण्यात आली. ही हत्या अत्यंत घातक अत्याधुनिक टेक्नोलॉजी वापरुन करण्यात आली. मोहसीन फाखरीझादेह यांच्यावर सॅटलाइटने नियंत्रित होणाऱ्या मशीन गनमधून गोळया झाडण्यात आल्या. रेव्हेल्युशनरी गार्डच्या उप कमांडरने रविवारी स्थानिक मीडियाला ही माहिती दिली.

इराणची राजधानी तेहरान बाहेरील रस्त्यावरुन मोहसीन फाखरीझादेह यांची कार धावत होती. त्यावेळी मशीन गनने त्यांच्या चेहऱ्यावर झूम करुन १३ गोळया झाडल्या अशी माहिती अ‍ॅडमिरल अली फादावी यांनी दिली. निसान पिकअपच्या छोटया ट्रकवर ही मशीन गन बसवण्यात आली होती. मशीन गनने मोहसीन फाखरीझादेह यांच्या चेहऱ्याभोवती फोकस करुन गोळया झाडल्या.

फाखरीझादेह यांच्यापासून त्यांची पत्नी १० इंच अंतरावर बसली होती. पण तिला एकही गोळी लागली नाही. ही हत्या म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा एक प्रकार आहे. यामध्ये मशीन मानवी बुद्धीप्रमाणे कृती करते. “सॅटलाइटच्या माध्यमातून मशीन गन ऑनलाइन कंट्रोल करण्यात आली. अत्याधुनिक कॅमेऱ्याचाही वापर करण्यात आला” असे अली फादावी यांनी सांगितले. मोहसीन फाखरीझादेह यांच्या हत्येसाठी इराणने इस्रायल आणि पीपल मुजाहिद्दीन ऑफ इराणवर आरोप केला आहे.

फाखरीझादेह यांच्या हत्येनंतर तेहरानमध्ये सरकारी इमारतीबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. फाखरीझादेह यांच्या हत्येचा बदला घेण्याची मागणी होत आहे. यावर्षी तीन जानेवरीला कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या ड्रोन स्ट्राइकमध्ये मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये अशीच संतापाची लाट उसळली होती. आता सुद्धा तशीच भावना आहे. अमेरिका, इस्रायलसह पाश्चिमात्यदेश फाखरीझादेह यांच्याकडे इराणच्या अण्वस्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून पाहत होते.