आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISISचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी आज सकाळी “काही तरी खूप मोठं घडलंय” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यामुळे बगदादीच्या खात्याच्या शक्यतेबाबत जगभरात चर्चा सुरु होती. मात्र, आता याला खुद्द ट्रम्प यांनीच पुष्टी दिली आहे. सिरियामध्ये अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली.


ट्रम्प यांनी म्हटले की, “कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याची तीन मुलं आणि अनेक सहकारी देखील मारले गेले आहेत. बगदादी एका खंदकात लपून बसला होता. अमेरिकेच्या सैन्याने घेरल्यानंतर त्याने स्वतःसह आपल्या मुलांना भूसुरुंगाच्या सहाय्याने उडवून दिले, तो भेकड होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या सैन्य दलाने शनिवारी वायव्य सिरियात झालेल्या हल्ल्यात बगदादीला लक्ष्य केल्याचं वृत्त सीएनएनने सकाळी दिलं होतं. अमेरिकेच्या सैन्याने ISISच्या तळांवर हल्ला केला, त्यावेळी बगदादीवर निशाणा साधण्यात आला. अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याचा हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिलं होतं. याबाबत डोनाल्ड ट्रम्प घोषणा करणार असल्याचंही सांगितलं जात होतं. वृत्तसंस्था reuters ने ही या वृत्ताला दुजोरा दिला होता. तसेच, अमेरिकेने बगदादीचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे, असं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

गेल्या पाच वर्षांपासून लपून असलेला बगदादी हा अनेकदा हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे वृत्त यापूर्वी आले आहेत. दोन वर्षांपूर्वीही रशियाच्या सैन्याने बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हा दावा खोटा ठरला होता.