30 September 2020

News Flash

इसिसच्या लैंगिक शोषणामुळे माघारी

इसिसकडून पुरुष व स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जात होते. भारतातून गेलेल्या युवकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. यामुळेच आपण माघारी परतल्याचे कारण इसिस संघटनेसोबत लढाईत

| May 22, 2015 05:03 am

इसिसकडून पुरुष व स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जात होते. भारतातून गेलेल्या युवकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. यामुळेच आपण माघारी परतल्याचे कारण इसिस संघटनेसोबत लढाईत भाग घेण्यासाठी इराक व सीरियाला गेलेल्या कल्याणच्या अरिब मजिदने राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितले.
मागील वर्षी मेमध्ये कल्याणचे चार युवक इसिस या आतंकवादी संघटनेसोबत युद्धात भाग घेण्यासाठी इराक व सीरियाला गेले होते. यापैकी अरिब हा भारतात परतला होता. त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणी अरिब व त्याच्या तीन मित्रांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने आठ हजार पानांचे आरोपपत्र बुधवारी दाखल केले. अरिबवर बेकायदेशीर कृत्ये केल्याप्रकरणी भा. दं. वि. कलम १२५नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
संकेतस्थळांवरील छायाचित्रे व चित्रफिती पाहून आपण इसिसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र तिकडे गेल्यावर पुरुष व स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे, दुय्यम दर्जाची वागणूक देणे आदी प्रकारांमुळे कंटाळून भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचे अरिब याने सांगितले. इसिस धर्मासाठी लढत असल्याचा दावा करते. पण वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे. भारतातून आलेल्या युवकांशी उघड उघड भेदभाव केला जातो. अरब देशांतून आलेल्यांना खरे जिहादी लढवय्ये समजले जाते. महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजली जाते, असा खुलासा त्याने एनआयएकडे केला.
रक्कामधील त्यांच्या प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अरिबला जिहादींच्या गटात सहभागी करण्यात येणार होते. मात्र शेवटच्या मिनिटाला हा निर्णय रद्द करण्यात आला व जिहादींसाठी कोंडून ठेवलेल्या स्त्रियांवर पाळत ठेवण्याचे काम दिले गेल्याचे त्याने तपासात सांगितले. रक्का येथील बॉम्ब हल्ल्यात अरिब जखमी झाला होता. मात्र त्याला स्वत:च उपचार करावे लागले. या सर्व कारणांमुळे त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
याप्रकरणी एनआयएने अरिबचा मोबाइल, त्याच्या इराकमधील सहा महिने वास्तव्याची पुराव्यांसह ८७ कागदपत्रे जोडली आहेत. यामध्ये त्याच्या फोनवरील संभाषणाच्या तपशिलांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2015 5:03 am

Web Title: islamic state use of people as sex slaves made me return areeb to nia
टॅग Isis,Islamic State
Next Stories
1 मलेशिया, इंडोनेशियाकडून विस्थापितांना आश्रय
2 वैद्यकपूर्व चाचणीप्रश्नी गरज भासल्यासच फेरपरीक्षा
3 मोदींच्या कार्यक्रमाला वाजपेयींना आमंत्रण, पण अडवाणींना नाही…
Just Now!
X