इस्त्रायलमधील अशकेलॉन शहाराच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय वंशाची महिलाही उतरली आहे. डॉ. रिंकी सहाय असे या उमेदवाराचे नाव असून त्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत. बडोदा आणि अशकेलॉन शहरात झालेल्या करारामुळे निवडणूक लढण्यास आपण प्रेरित झाल्याचे रिंकी यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी बडोदा आणि अशकेलॉन या शहरांमध्ये एक करार झाला होता. दोन्ही शहरांना जवळ आणण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमात मी सहभागी होत असते. या करारापूर्वी अशकेलॉन शहराचे भारताबरोबर कमी संबंध होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्या बडोद्याला आल्या आणि इथे अनेक लोकांची भेट घेतली. जेव्हा मी भारतीय संस्कृतीशी जोडले गेले. तेव्हा मला इतर समाजाचे धैर्य आणि सहिष्णुतेच्या मूल्यांबाबत समजले. आता मी महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.

त्या येथील महापालिकेच्या सदस्य पण आहेत. मागील वर्षी बडोद्यातील फ्रेंड्स ऑफ इस्त्रायलमध्ये सांस्कृतिक आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. रिंकी यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. रिंकी या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्या व्याख्यात्या आहेत. महिला शिक्षणासाठी त्या काम करतात. पाच वर्षांपूर्वी त्या पालिकेच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. त्या शिक्षण, महिला सबलीकरण आणि छोट्या व्यापारांसाठी काम करतात. त्यांचे आई-वडील हे महाराष्ट्रीयन ज्यू आहेत. १९६४ मध्ये ते इस्त्रायलमध्ये स्थायिक झाले होते. अशकेलॉन शहरात महाराष्ट्रातील ज्यू समुदाय मोठ्याप्रमाणात आहे. रिंकी यांना त्यांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.