इस्रायलने इराणमध्ये केलेल्या स्पेशल ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार झाला आहे. १९९८ साली आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात त्याची भूमिका होती. इस्रायलने ऑगस्ट महिन्यात इराणमध्ये हे ऑपरेशन केले. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

अब्दुल्लाह अहमद अब्दुल्लाह हा इराणमध्ये अबू मुहम्मद अल-मासरी नाव धारण करुन राहत होता. सात ऑगस्टला तेहरानच्या रस्त्यावर अब्दुल्लाह अहमदची बाईकवरुन आलेल्या दोघांनी गोळया झाडून हत्या केली. अबू मुहम्मद अल-मासरीकडे अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या आयमन अल-झवाहीरीची उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. इराणमध्ये आश्रयाला असलेला मासरी आणि अल-कायदाच्या अन्य दहशतवाद्यांवर अमेरिकन यंत्रणांची मागच्या अनेक वर्षांपासून नजर आहे. अल-कायदाने त्यांच्या नंबर दोन दहशतवाद्याची हत्या झाल्याचे जाहीर केले नाही. इराणच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या घटनेवर पडदा टाकला.

रॉयटर्सशी बोलताना अमेरिकन अधिकाऱ्याने टाइम्सच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यास तसेच अमेरिकेच्या सहभागाबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. स्थापनेपासून मासरी अल-कायदासोबत होता. अमेरिकेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो पथकाने २०११ साली पाकिस्तानात स्पेशल ऑपरेशनमध्ये कंठस्नान घातले होते.