आणीबाणीवेळी अवकाशवीरांना जमिनीवर आणण्याचे तंत्र

चांद्रयान, मंगळस्वारी, एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. मानवी अवकाश मोहिमेतील आणीबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यासाठीच्या तंत्राची इस्रोने गुरुवारी यशस्वी चाचणी केली.

मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू एस्केप सिस्टीमची म्हणजेच अवकाशवीरांना आणीबाणीच्या क्षणी जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी इस्रोने यशस्वी केली. मानवी अवकाश मोहिमेमध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यासही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. त्यानंतर हे क्रू मोडय़ुल म्हणजे अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो. उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली ही पहिलीच आकस्मिक आपदा चाचणी असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन केंद्रावरून गुरुवारी सकाळी प्रक्षेपक आकाशात झेपावले. प्रक्षेपक यान जमिनीपासून २.७ कि.मी. ऊंचीवर असताना एस्केप सिस्टीम आणि क्रू मोडय़ुल प्रक्षेपक यानापासून वेगळे करण्यात आले. चाचणीच्या वेळी अंतराळवीराऐवजी त्याचा पुतळा वापरण्यात आला होता. यानाचे दोन भाग होताच अंतराळवीराचा पुतळा असलेले कॅप्सूल पॅराशूटच्या साहाय्याने बंगालच्या उपसागरात विशिष्ट ठिकाणी उतरविण्यात आले.

या चाचणीमुळे अवकाशयानाला अपघात झाल्यास किंवा काही कारणाने ते कोसळल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविता येणे शक्य होणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीननेच मानवी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. गुरुवारी सकाळी प्रक्षेपण झाल्यानंतर यान २५९ सेकंदांनंतर एस्केप सिस्टीम आणि मोडय़ुल प्रक्षेपकापासून अलग झाले. जवळपास ३०० सेन्सरद्वारे हालचालींची नोंद करण्यात आली.