भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच मंगळावर यान पाठवणार असून या ‘मार्स ऑरबायटर’ यानाची पहिली थर्मो-व्हॅक्यूम चाचणी मंगळवारी यशस्वी झाली. हा प्रकल्प साडेचारशे कोटी रुपये खर्चाचा आहे. अंतराळातील स्थितीचे सादृशीकरण करून ही चाचणी घेण्यात आली. आता कंपन व ध्वनि चाचण्या घेणे बाकी आहे. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे यान उड्डाणासाठी श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावर उड्डाणासाठी सज्ज केले जाईल. तेथे उड्डाणाची तयारी अगोदरच सुरू आहे. मंगळ यान ‘पीएसएलव्ही सी २५’ या प्रक्षेपकाच्या मदतीने २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात सोडले जाणार आहे. पीएसएलव्ही सी २५ प्रक्षेपकाची बांधणी करण्यात येत असून १० ऑक्टोबरला प्रक्षेपक पूर्णपणे सज्ज होईल, असे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. मंगळावर यान पाठवण्याची तांत्रिक क्षमता सिद्ध करणे, मंगळावर जीवसृष्टी शोधण्यासाठी प्रयोग करणे, मंगळाची छायाचित्रे घेणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. नोव्हेंबरमधील संभाव्य उड्डाणानंतर हे यान १० महिने प्रवास करून मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. हे यान मंगळाविषयी नवीन माहिती देईल, अशी आशा इस्रोचे प्रमुख के.राधाकृष्णन यांनी व्यक्त केली.