बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रयी जनता दल(राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे समोर येत आहे. त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता त्यांच्या सुटकेची मागणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यादव यांनी आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी ‘आझादी पत्र’ अभियान सुरू केले आहे. त्यांनी राष्ट्रपतींकडे लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेची मागणी केली आहे. याशिवाय, बिहारमधील जनतेला देखील या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

या संदर्भात तेजप्रताप यादव यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, “ज्यांनी आपल्याला बळ दिलं, आज वेळ आली आहे त्यांच्यासाठी ताकद निर्माण करण्याची. एका अभियानाशी जोडलं जा आणि आपल्या नेत्याच्या सुटकेसाठी मागणी करा. गरिबांचे कैवारी आदरणीय लालू प्रसाद यादव यांच्यासाठी एक ‘आझादी पत्र’ राष्ट्रपती पर्यंत पोहचवा.”

तेजप्रताप यांनी हे देखील म्हटले आहे की, “माझ्या वडिलांना खोट्या खटल्यामध्ये अडकवलं गेलं आहे आणि आजपर्यंत बंदी बनवून ठेवलं आहे.  माझे वडिल अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. तरी देखील त्यांना तुरुंगात ठेवलं गेलं. हा केंद्रकाडून राजकीय छळ आहे.  एक मुलगा या नात्याने मी संकल्प केला आहे की, त्यांचा आवाज जनमाणसांपर्यंत पोहचवायचा आहे. मग माझा जीव गेला तरी हरकत नाही. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही,तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील.”

रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने अधिक चांगले उपचार मिळावेत या दृष्टीने रिम्समधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता.

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल

लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती. त्यानंतर त्यांना तातडीने शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आले.