नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा पत्ता कट करत, भाजपाकडून तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. सुशीलकुमार मोदींना वगळण्यात आल्याबद्दल नितीश कुमार यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हा भाजपाचा निर्णय असल्याचं सांगितलं आहे.

”सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री न बनवण्याचा निर्णय हा भाजपाचा आहे. त्यांना याबद्दल विचारलं पाहिजे.” असं ते म्हणाले. तसेच, ”जनतेच्या निर्णयाच्या आधारावर एनडीएने पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थानप केलं आहे. आम्ही सोबत काम करू व जनतेची सेवा करू.” असं देखील नितीश कुमार यांन यावेळी सांगितलं.

तर, या अगोदर तुम्हाला सुशीलकुमार मोदी यांची आठवण येत आहे का? असं नितीश कुमार यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी ‘होय’ असं एका शब्दात उत्तर दिलं.

पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
तसेच, यावेळी जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

बिहार निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.