ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटण्याची अनुकूलता दर्शविली आहे. या संदर्भात मोदी आणि त्यांच्या सरकारसमवेत चर्चा सुरू आहे, असे कॅमेरून यांनी सांगितले.
आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदी यांची यापूर्वीच भेट घेतली असून त्यांच्यामार्फत पुढील तपशील ठरविण्यात येतील, असे कॅमेरून म्हणाले. आम्ही सर्व राजकीय नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात नेहमीच उत्सुक असतो, असे त्यांनी नमूद केले.
कॅमेरून यांनी गुरुवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेऊन उभय देशांतील द्विपक्षीय संबंध तसेच व्यापारी संबंध दृढ करण्यावर भर दिला. मनमोहन सिंग यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चा करण्यावरही कॅमेरून यांनी अनुकूलता दर्शविली. उभय देशांमध्ये अनेक सारख्या गोष्टी आहेत. दोन्ही देशांत प्राचीन लोकशाहीची परंपरा आहे. दोन्ही देशांना दहशतवादाचा मुकाबला करावा लागतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत यशस्वी व्हावे, असे दोन्ही देशांना वाटते. याआधीही दोन्ही देशांचे दृढ संबंध होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.