आंतरराष्ट्रीय न्यायालयाची इटलीला सूचना
इटलीच्या नौसैनिकांकडून भारतीय मच्छीमारांना ठार मारण्याचा गुन्हा जर भारतीय सागरी हद्दीत घडल्याचे सिद्ध झाले तर इटलीने आपल्या नौसैनिकाला भारतात पाठवले पाहिजे, इशी सूचना द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी इटलीच्या सरकारला केली.
दोन्ही देशांनी या प्रकरणी एकमेकांना सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातही इटलीने भारताला सहकार्य केले पाहिजे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून साल्वाटोर गिरोन याला इटलीत जाण्याची परवानगी देता येईल. मात्र न्यायालयीन कामकाजात गरज भासल्यास त्याने भारतात परतणे आवश्यक आहे, असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले.
केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ २०१२ साली दोन भारतीय मच्छीमारांना गोळीबारात मारल्याप्रकरणी इटलीच्या साल्वाटोर गिरोन आणि मॅसिमिलियानो लाटोरे या दोघा नौसैनिकांना भारताने पकडून खटला चालवला होता. मात्र गुन्हा भारताच्या सागरी हद्दीत
घडला नाही असे इटलीचे म्हणणे आहे. यातील लाटोरे याला २०१४ साली वैद्यकीय कारणांसाठी मायदेशी रजेवर पाठवण्यास भारताने परवानगी दिली. मात्र गिरोन अद्याप भारताच्या ताब्यात आहे. त्यालाही मायदेशी पाठवले जावे म्हणून इटली प्रयत्नशील आहे. आता हे प्रकरण द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवले जात आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले होते की भारताने दुसऱ्या नौसैनिकालाही इटलीत पाठवावे. पण त्याच्या पाठवणीसंदर्भातील तपशील ठरवण्याचे अधिकार भारतीय सर्वोच्च न्यायालयाला दिले होते. आता न्यायालयाने म्हटले आहे की, गरज भासल्यास इटलीने नौसैनिकांना भारतात परत पाटवले पाहिजे आणि ते भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्याच अधीन राहतील.