दोन भारतीय मच्छीमारांना ठार केल्याच्या प्रकरणी आरोपी असलेल्या दोन इटालियन नौसैनिकांवर चाचेगिरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा भारताचा निर्णय धक्कादायक आहे व आम्ही त्यामुळे सुन्नच झालो आहोत, असे इटलीच्या परराष्ट्र मंत्री एमा बोनिनो यांनी सांगितले. भारताच्या या निर्णयाला कायदेशीर पातळीवर अधिक ठामपणे आव्हान दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बोनिनो म्हणाल्या की, दिल्लीतील सूत्रांकडून या नौसैनिकांवरील कारवाईबाबत जी माहिती मिळाली आहे ती संतापजनक आहे. साल्वातो गिरोने व मॅसिमिलानो लाटोरे या दोन नौसैनिकांना मायदेशी आणण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
भारताच्या गृहमंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेस इटलीच्या दोन नौसैनिकांवर एसयुए कायद्यातील नवीन तरतुदीनुसार कारवाई करण्यास परवानगी दिली असून त्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, पण भारताने नंतर त्यावर माघार घेत त्यांच्यावरील खुनाचे आरोप सौम्य केले होते. जर या दोन नौसैनिकांना एसयूए कायदा लावला तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल असे बोनिनो म्हणाल्या. नौसैनिकांनी दोन भारतीय मच्छीमारांना ठार केले होते, त्याबाबतच्या प्रकरणांची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होत असून न्यायालयाने या दोन नौसैनिकांना चाचेगिरीविरोधी कायदा लावावा की नाही याबाबतचे प्रश्न अगोदरच निकाली काढावेत असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.  जे दोन नौसैनिक सुनावणीस सामोरे जात आहेत ते दहशतवादी नाहीत व चाचेही नाहीत असे बोनिनो यांनी सांगितले.
हे दोन नौसैनिक एनरिका लेक्सी या इटालियन जहाजावर होते व त्यांना आता नवी दिल्ली येथे इटालियन दूतावासाच्या परिसरातच ठेवण्यात आले आहे. त्यांनी केरळ किनाऱ्यावर दोन भारतीय मच्छीमारांना ठार केले होते. हे मच्छीमार चाचे आहेत असे समजून आम्ही गोळीबार केला, असे या नौसैनिकांचे म्हणणे आहे. या नौसैनिकांवरील खटला इटलीत चालवावा कारण ही घटना आंतरराष्ट्रीय सागरात घडली आहे, असे इटलीचे म्हणणे आहे. मरण पावलेले लोक भारतीय असून ते भारतीय बोटीवर मच्छीमारी करीत होते त्यामुळे इटलीच्या नौसैनिकांवर भारतातच खटला चालवला गेला पाहिजे असे भारताचे म्हणणे आहे.