प्रसाद हावळे, लोकसत्ता

जयपूर : भारतीय इंग्रजी आणि जागतिक साहित्य व्यवहाराची घुसळण घडवणारा ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ गुरुवारपासून सुरू झाला. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून निर्माण झालेल्या अस्वस्थतेचे पडसाद शुक्रवारच्या सत्रांत उमटले. देशातील आर्थिक मंदीबाबतही या व्यासपीठावर चिंता व्यक्त झाली. देशासमोरील या अंतर्बाह्य़ आव्हानांचा मागोवा घेणाऱ्या सत्रांना शुक्रवारी तुडुंब उपस्थिती होती.

जानेवारीच्या बोचऱ्या थंडीत २००६ पासून दरवर्षी जयपूर साहित्य मेळा भरतो. २७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या साहित्य मेळ्यात साहित्यनिष्ठ आणि पुस्तककेंद्री चर्चासत्रांबरोबरच वर्तमानातील कळीच्या मुद्दय़ांवर मंथन करणाऱ्या सत्रांची रेलचेल आहे. शुक्रवारी वर्तमान वास्तवाची दखल घेणाऱ्या सत्रांना तरुणाईने गर्दी केली होती.

‘द अनरॅव्हलिंग’ या सत्रात रक्षंदा जलील, हर्ष मॅण्डर, पवन के. वर्मा आणि अभिनव चंद्रचूड यांनी समाजातील अस्वस्थतेच्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला. नागरिकत्व कायद्याविरोधी निदर्शनांवर आक्षेप घेणाऱ्यांचा वर्मा यांनी, ‘‘घटनेच्या १९ व्या अनुच्छेदानुसार मतभेद नोंदवण्याचा अधिकार सर्वाना मिळाला आहे. त्या अधिकारानुसार होणारी आंदोलने अराजकतावाद नव्हे,’’ अशा शब्दांत प्रतिवाद केला. ते म्हणाले, ‘‘संसदेने नागरिकत्व कायदा संमत केल्यामुळे त्यास विरोध करू नये, असे म्हणणाऱ्यांनी हेही ध्यानात ठेवावे की, आणीबाणीही कायदेशीर मार्गानीच आली होती.’’ आदी शंकराचार्यावर पुस्तक लिहिणाऱ्या वर्मा यांनी भारतीय संस्कृती समावेशक असून संवाद, मंथन, विरोधी विचारांचा आदर ही तिची वैशिष्टय़े असल्याचे अधोरेखित केले.

याच सत्रात लेखक हर्ष मॅण्डर यांनी ‘‘महात्मा गांधींच्या हिंदू-मुस्लीम एकतेसाठीच्या शेवटच्या उपोषणानंतर त्याच उद्देशाने आकाराला आलेले आंदोलन’’ असे नागरिकत्व कायद्याविरोधी निदर्शनांचे वर्णन केले. तर युवा कायदा अभ्यासक अभिनव चंद्रचूड यांनी नागरिकत्व कायद्यातील दुरुस्त्या राज्यघटनाबाह्य़ असल्याचे स्पष्ट केले. मूळ नागरिकत्व कायद्यातील तरतुदींना भारत-पाकिस्तान आणि त्यानंतरच्या हिंसाचाराची पाश्र्वभूमी होती, तशी कोणतीही परिस्थिती नसताना संविधानातील अस्पष्ट उल्लेखाचा गैरफायदा घेत कायद्यात अशी दुरुस्ती करणे अयोग्य आहे, असे चंद्रचूड म्हणाले.

या सत्राबरोबरच गतवर्षी पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील ‘हाऊडी, मोदी!’ या कार्यक्रमाची आणि त्याभोवतीच्या मुद्दय़ांची चर्चा ‘हाऊडी, अमेरिका!’ या सत्रात झाली. माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण, ‘द हिंदू’चे अमेरिकाविषयक प्रतिनिधी वर्गीस जॉर्ज आणि ‘द न्यू यॉर्क टाइम्स’चे जेफरी गेटलमन यांनी भारत-अमेरिका संबंधांतील आव्हानांचा आढावा घेतला. भारत अलिप्ततावादी चळवळीचा पुरस्कर्ता असला तरी भारताने आपली द्वारे बंदिस्त ठेवली नव्हती, असे स्पष्ट करत सध्याच्या स्थितीत हवामान बदल असो वा आरोग्यविषयक प्रश्न, भारताने आंतरराष्ट्रीय संघटनांशी संवाद राखणे गरजेचे असल्याचे मत सरण यांनी आग्रहाने मांडले. तर वर्गीस जॉर्ज यांनी अमेरिकेतील भारतीयांच्या मानसिकतेची मीमांसा हिंदुत्ववादी राजकारणाच्या संदर्भात करत देशांतर्गत राजकीय संस्कृतीचा धोरणात्मक प्रक्रियेवरील प्रभाव उलगडून दाखवला. जेफरी गेटलमन यांनी भारताविषयीची अमेरिकी निरीक्षणे मांडत अमेरिकेला भारताबाबत रस असल्याचे सांगितले खरे, पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत!

‘एशिया रायझिंग’ या सत्रात अभ्यासक ब्रुनो मकाय, शिवशंकर मेनन आणि दीपक नय्यर यांनी आशिया खंडाचे भूराजकारणातील भारताचे स्थान नेमकेपणाने सांगितले. चीनचे आव्हान आहेच, पण भारताने स्वत:च्या क्षमता जाणून ‘बहुध्रुवीय विश्वसत्ते’चा पुरस्कार करणेच योग्य ठरेल, असे मेनन यांनी स्पष्ट केले.

 

संवाद मैफली

जयपूर साहित्य मेळ्यात शुक्रवारी काही संवादमैफलींनी साहित्य चर्चेत रंग भरला. शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांची ‘लूकिंग फॉर मिस सरगम’ या त्यांच्या लघुकथा संग्रहानिमित्ताने आणि ‘शशी ऑन शशी’ या नावाने जमलेली शशी थरूर यांची आत्मसंवाद साधणारी मैफल यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय तंत्रज्ञान आणि पाळतशाही यांची चर्चा करणारे सत्र तसेच सौदी राजदूत ओमर घोबाश यांच्या ‘लेटर्स टु ए यंग मुस्लीम’ या पुस्तकावरील चर्चासत्राला लक्षणीय उपस्थिती होती.