संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करता आले नाही. पण फ्रान्सने आपल्या बाजूने पाऊल उचलले असून मसूदची फ्रान्समधील संपत्ती जप्त करण्याचा  निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये मसूद अझहरचा समावेश करण्याचा प्रयत्न करु असे फ्रान्सचे अंतर्गत मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांच्या मुसक्या आवळण्यासाठी पाकिस्तानवर जागतिक दबाव वाढत आहे. मागच्या महिन्यात काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले.

फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव दाखल केला होता. पण चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करुन हा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर मसूदला मिळणारी आर्थिक मदत मोठया प्रमाणात बंद झाली असती. पण चीनने आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपल्या हितांचा विचार करुन जैशच्या म्होरक्याला जागतिक दहशतवादी घोषित होण्यापासून वाचवले. मागच्या दोन दशकात मसूदच्या जैशने भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. भारतीय संसद, पठाणकोट, उरी आणि आता पुलवामा हल्ल्यामागे जैशचाच हात आहे.