आमच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करून अरूण जेटली आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताहेत. पण आम्ही त्यांना घाबरणार नाही. आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई अशीच पुढे सुरू राहिल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी जेटलींच्या बदनामीच्या खटल्याला उत्तर दिले. दिल्ली सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीपुढे अरूण जेटली नक्कीच उपस्थित राहतील आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करून दाखवतील, असेही आव्हान केजरीवाल यांनी त्यांना दिले.
जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात दहा कोटींचा बदनामीचा खटला दाखल केला. केजरीवाल यांच्यासह संजय सिंग, राघव चढ्ढा, आशुतोष आणि दीपक वाजपेयी यांच्याविरोधातही बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केल्याचा निराधार आरोप करून आपली बदनामी केल्याचे जेटली यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. डीडीसीएच्या कारभारातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने रविवारी गोपाल सुब्रमण्यम यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटली यांच्याकडून बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.