जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरु झाली आहे. सीमा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे जम्मू- काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. हे चौघेही दहशतवादी संघटनेचे समर्थक होते.

सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरु असतानाच घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी माछिल सेक्टरमधील पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न सुरु असल्याचे सैन्याच्या जवानांच्या निदर्शनास आले. सैन्याने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत असल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

घुसखोरीचा डाव उधळून लावल्याची घटना ताजी असताना तेंगपोरा येथेही जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चार जणांना अटक केली. हे चौघेही दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर’ होते अशी माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यापूर्वी चार दिवसांपूर्वी बांदीपोरा जिल्ह्यातही सैन्याने घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. बांदीपोऱ्यातील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. सीमा रेषेवर पाककडून घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे प्रकार वाढत असले तरी पाकने भारतावरच आरोप केले होते. भारताने यंदाच्या वर्षात आतापर्यंत ५४२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा कांगावा पाकने केला होता.