जम्मू-काश्मीरमध्ये सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घातले. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली.

कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये शनिवारी सैन्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना काही तरुण  भारतात घुसखोरी करत असल्याचे दिसले. त्यांनी घुसखोरांना इशारा दिला असता घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी सैन्याच्या पथकावर गोळीबार केला. काही वेळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. सैन्याच्या प्रत्युत्तरात २ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. ‘माछिल सेक्टरमध्ये शनिवारी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले’ अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. या परिसरात शोधमोहीमही सुरु असल्याचे समजते.

सीमा रेषेवर घुसखोरीच्या घटना सुरुच असून यापूर्वी ५ सप्टेंबररोजीही घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. अर्निया सेक्टरमध्ये ही घटना घडली होती. जूनपर्यंत सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्न केल्याच्या २२ घटना घडल्या होत्या. यात ३४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी कंठस्नान घातले होते.