गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर संतप्त स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली आहे. विशेष म्हणजे दगडफेक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा आणि महिलांचा समावेश आहे. मात्र, दगडफेक करणाऱ्यांनी यावेळी सुरक्षादलापेक्षा माध्यम प्रतिनिधींना जास्त लक्ष्य केलं आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या ओबी व्हॅनवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मिरमध्ये अशप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांसोबत सुरक्षदलाची चकमक सुरू असल्यास स्थानिकांकडून दगडफेक केली जाते. सुरक्षादलाचं लक्ष हटवणं आणि दहशतवाद्यांना पसार होण्यामध्ये मदत करणं हा या दगडफेकीमागचा थेट हेतू असतो.

दरम्यान, बडगाम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षादलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.