करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद पडलेल्या आहेत. भारतामध्येही बीसीसीआयपासून सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. खेळाडू कोणताही असतो त्याच्यासाठी मैदान हे त्याचं घरच असतं. मात्र सध्याच्या खडतर काळात भारताचा फुटबॉलपटू सी.के.विनीतने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. विनीत केरळ सरकारच्या करोनाविरुद्ध हेल्पलाईन सेंटरवर नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करतोय. आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विनीतने भारतीय फुटबॉल संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे, तर आयएसएल या स्पर्धेत तो जमशेदपूर संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

“मी ज्यावेळी केरळमध्ये परत आलो, त्यावेळी Kerala Sports Council तर्फे मला या कामाबद्दल विचारण्यात आलं आणि मी देखील याला लगेच हो म्हटलं. सध्याच्या खडतर काळात माझ्याकडून जी काही मदत होणं शक्य आहे ती मी करतोय.” अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात विनीतने आपली प्रतिक्रीया दिली आहे. विनीत हा केरळमधला सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू मानला जातो. २८ मार्चपासून विनीतने केरळमधील हेल्पलाईन सेंटरवर काम करायला सुरुवात केली आहे. लॉकडाउन पूर्णपणे बंद होईपर्यंत आपण असंच काम सुरु ठेवणार असल्याचं विनीतने स्पष्ट केलं.

हेल्पलाईन सेंटरमध्ये विनीत आणि इतर कर्मचारी सरकारने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत आहेत. ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायर या सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये आम्हा प्रत्येकाला दिवसातून सुमारे १५० फोनकॉल्स येत होते, आता याचं प्रमाण जरा कमी होत चाललं आहे. केरळमध्येही करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे अशा खडतर परिस्थिती सर्व नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करणं गरजेचं असल्याचं विनीतने सांगितलं.