जपानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या १५६ वर पोहोचली आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांचीही मोठी संख्या आहे. मागील तीन दशकातील जपानमधील ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सरकारी प्रवक्ते योशिहिदे सुगा यांनी सांगितले. अजूनही अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. यामुळे जपानमधील सुमारे २० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाची तीव्रता कमी झाली असून बचाव पथकाकडून मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी चार देशांचा आपला परदेश दौरा रद्द केला आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, पूरबाधित लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. या भागातील फोन सेवाही बंद आहेत. सुमारे १७ हजार घरांमधील वीज पुरवठा बंद झाला आहे. पोलीस, अग्निशामक दल आणि लष्कराचे सुमारे ७३ हजार जवान बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता असून अजूनही बचाव कार्य सुरू असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

पावसानंतर आलेल्या पुराचा जपानमधील औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे किती आर्थिक नुकसान झाले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, पंतप्रधान शिंजो आबे हे बेल्जियम, फ्रान्स, सौदी अरेबिया आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांनी हा दौर रद्द केला असून ते पूरबाधीत क्षेत्राचा या आठवड्यात दौरा करण्याची शक्यता आहे.