जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. गेल्या दहा दिवसांपासून थयथयाट सुरू असून शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने रोष व्यक्त करणे पाकने सुरू केले आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधी धुडकावून लावत गोळीबार करीत आहे. शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे. दरम्यान, पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता.

यापूर्वी भारतीय स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने गोळीबार केला होता. कृष्णा घाटी सेक्टरमधील सीमेनजीक असलेल्या गावांना पाक लष्कराकडून निशाणा बनवण्यात आले होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले असून दोन्ही देशातील व्यापाराबरोबर रेल्वे आणि बससेवाही बंद केली आहे. तसेच भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांना माघारी पाठवले असून काश्मीरसाठी संग्राम करण्याच्या धमक्या पाककडून सुरूच आहेत.