आमदाराचे पती व अंगरक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आपल्या वाहनाला ‘ओव्हरटेक’ करून गाडी पुढे नेली म्हणून आदित्य सचदेव या २० वर्षांच्या युवकाचा गोळी घालून खून करणारा बिहारमधील जनता दल (यू)च्या आमदार मनोरमा देवी यांचा पुत्र रॉकी यादव याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ गया शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रॉकीचे वडील बिंदी यादव व मनोरमा यादव यांचा अंगरक्षक यांची न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

रविवारच्या भीषण खुनाच्या घटनेनंतर फरारी झालेला राकेश रंजन ऊर्फ रॉकी कुमार यादव याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घातले. रॉकीच्या अटकेसाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

गया व परिसरात बाहुबल आणि पैशांची ताकद यासाठी प्रसिद्ध असलेले रॉकीचे वडील बिंदेश्वरी प्रसाद ऊर्फ बिंदी यादव आणि विधान परिषदेच्या आमदार मनोरमा देवी यांचे अंगरक्षक राजेश कुमार यांना रॉकीला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल पोलिसांनी रविवारीच अटक केली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजयकुमार झा यांनी दोघांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. त्यांना चौकशीसाठी गयेच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले असल्याचे मगध विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सौरभ कुमार यांनी सांगितले.

आदित्य सचदेव याच्या खुनाच्या निषेधार्थ भाजपसह इतर सामाजिक व राजकीय संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार गया शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला. दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रेमकुमार यांच्या नेतृत्वात निदर्शकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत आणि आरोपीच्या अटकेची मागणी करत कोतवाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या लोकांना नंतर पोलिसांनी स्थानबद्ध केले.

घटनेच्या वेळी आदित्यसोबत त्याच्या कारमध्ये प्रवास करत असलेल्या मो. नासीर, मो. कैफी, अंकित कुमार व आयुष अग्रवाल या त्याच्या चार मित्रांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये त्यांचे बयाण नोंदवले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी राकेश रंजन

सिंग यांच्यासमोर नोंदवलेल्या या निवेदनात त्यांनी रॉकी यादवने केलेल्या त्यांच्या मित्राच्या खुनाचा घटनाक्रम नोंदवला. आमदाराच्या मुलाने एका युवकाचा खून केल्याची घटना म्हणजे बिहारमध्ये ‘जंगल राज’ परतले असल्याचा भाजपचा आरोप चुकीचा आहे. बिहारमध्ये ‘कायद्याचे राज्य’ आहे आणि गुन्हेगार कायद्याच्या लांब हातातून सुटू शकणार नाही. भाजपसाठी गुन्हा करणारी व्यक्ती महत्त्वाची असली, तरी माझ्यासाठी ही घटना अधिक महत्त्वाची असून त्याचे कुटुंबीय कोण याला महत्त्व नाही.

– मुख्यमंत्री नितीश कुमार</strong>