देशात अजून एक मोठा आर्थिक गैरव्यवहार झालं असल्याचं समोर आलं असून यामागे झारखंडमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या व्यक्तीचा हात आहे. एखाद्या बँकेचे किंवा आरबीआयचे एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगत त्याने जवळपास एक लाख लोकांना गंडा घातला आहे. यासाठी त्याने आपल्यासोबात गावातील २०० तरुणांना सोबत घेतलं होतं, ज्यांना यासाठी ट्रेनिंग दिली गेली होती.

राम कुमार मंडळ असं या ३५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. १० वी नापास असलेल्या रामने गावातील २०० तरुणांना बँकेचे एक्झिक्युटिव्ह असल्याचं दाखवत लोकांना कशाप्रकारे गंडा घालावा यासाठी ट्रेनिंग दिली होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गोवा येथील लोकांना मुख्यत्वे टार्गेट केलं जात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना यासाठी नक्षलवादी मदत करत होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अखेर गावात येऊन पोहोचले. दिल्लीमधील एका महिलेला आरोपींनी आपण आरबीआयचे कर्मचारी असल्याचं सांगत तुमचं आधार लिंक करण्यासाठी मदत करत असल्याचा बनाव केला. महिलेने ओटीपी शेअर करताच तिच्या खात्यातून १ लाख ९ हजार रुपये ई-वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार केली.

“डीसीपी नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वात एक पथकाची निर्मिती करण्यात आली. ई-वॉलेट कुठून ऑपरेट केलं जात आहे याची जबाबदारी एका टीमवर सोपवण्यात आली. तर दुसरं टीम ई-वॉलेटचा वापर कुठून होत आहे, तसंच ऑपरेटर कोण आहे याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती”, अशी माहिती सहआयुक्त रविंद्र यादव यांनी दिली आहे.

पोलिसांनी ई-वॉलेटशी सर्व्हिसशी संपर्क साधत खातं ब्लॉक करण्यास सांगितलं. यानंतर ई-वॉलेटवरुन झालेल्या व्यवहारावरुन पोलिसांनी राम मंडळचा माग काढला. विशेष म्हणजे आरोपींची मोडस ऑपरेंडी अशी होती की पैसे थेट राम मंडळपर्यंत पोहोचत नव्हते, ज्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागू नये. पण पोलिसांनी आपलं कौशल्य वापरत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.