27 September 2020

News Flash

झारखंडही गेलं! ; अवघ्या दीड वर्षात महाराष्ट्रासह सात राज्ये झाली भाजपामुक्त

२०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती आता ती केवळ ३३ टक्के भूभागावर उरली आहे

भाजपाच्या हातून झारखंडही गेलं

झारखंड विधानसभेच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर झारखंडही भाजपाच्या हातून निसटल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यातील ८१ जागांसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर पडली होती. मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई असल्याचं चित्र पहायला मिळालं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. पहिल्या चार तासांच्या मतमोजणीनंतर काँग्रेसने बहुमतासाठी लागणारा ४१ जागांचा आकडा पार केला आहे. संध्याकाळी सहा वाजता काँग्रेस आणि मित्रपक्ष ४४ जागांवर आघाडीवर आहेत तर भाजपा २७ जागांवर आघाडीवर आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरत काँग्रेस-जेएमएमने आघाडी मिळवली आहे. या आधी मागील महिन्यामध्ये भाजपाने महाराष्ट्रामधील सत्ता गमावली होती. त्यामुळे आता देशातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ३३ टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उतरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.

२०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.

२०१४ साली भाजपा गुजरात, मध्य प्रेदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते.

भाजपाची देशातील विजयी घौडदौड मंदावली असली तरी त्यांनी मिझोरमसारख्या राज्यातही विजय मिळवत सत्ता स्थापन केली. असं असलं तरी दुसरीकडे बालेकिल्ला मानली जाणारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधील सत्ता भाजपाने गमावली. आंध्रप्रदेशमध्येही तेलगू देसम पार्टीने भाजपापासून फारकत घेत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्येही डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने तेथेही भाजपा आणि पीडीपीचे सरकार बरखास्त झाले.

२०१९ मध्येही भजापाची पडझड सुरुच राहिली. लोकसभेमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले. स्थानिक स्तरावरील राजकारणामध्ये मात्र भाजपाला फटका बसल्याचे दिसले. कर्नाटकमध्ये जुलै महिन्यामध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. अशाचप्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा डाव होता मात्र तो फसला आणि महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल आघाडीने झारखंडमध्ये भाजपाला पराभूत केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमधूनही भाजपाला पायउतार व्हावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 12:19 pm

Web Title: jharkhand election results bjp loses one more state after maharashtra scsg 91
Next Stories
1 Jharkhand election: कोणताही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा जिंकला नाही; रघुवर दास अपवाद ठरणार?
2 आसाम : मूळ आसामींना जमीन हक्काची हमी; सरकार कायद्यात करणार सुधारणा
3 Live : झारखंड निवडणूक निकाल : भाजपाला डबल धक्का; पराभवाबरोबर दुप्पट जागाही घटल्या
Just Now!
X