चीनमधील करोना संसर्गाची दखल वेळीच घेण्यात आली होती हे दाखवण्याचा प्रयत्न  म्हणून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी ३ फेब्रुवारीला केलेले भाषण तेथील सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले असून त्यामुळे लोकांचे समाधान होण्यासारखी स्थिती नाही. जर जिनपिंग यांना या धोक्याची जाणीव होती तर त्यांनी या नवीन विषाणूबाबत सर्वांना आधीच सतर्क का केले नाही, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

करोना विषाणूच्या संसर्गाची दखल कम्युनिस्ट नेतृत्वाने वेळीच घेतली होती हे दाखवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाषणानुसार क्षी जिनपिंग यांनी  ७ जानेवारीलाच या विषाणूशी लढण्याचे आदेश  दिले  होते व २३ जानेवारीला या विषाणूचा संसर्ग असलेली शहरे बंद करण्यास सांगण्यात आले होते. हुबेई प्रांतातून लोकांना बाहेर जाऊ  देऊ  नका, तसेच कडक नियंत्रणे ठेवा असेही आदेश त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात क्षी जिनपिंग हे या विषाणूची लागण झाल्यानंतरच्या प्राथमिक काळात गप्प होते. त्यांनी कुठल्याही हालचाली केल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या सात वर्षांंच्या राजकीय कारकिर्दीस धक्का बसला आहे अशी चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. पण जिनपिंग यांचे जे भाषण प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यावरून करोना विषाणूचे गांभीर्य काही आठवडे आधीच समजलेले होते. पण हा विषाणू माणसात पसरू शकतो असा धोक्याचा  इशारा जानेवारी अखेरपर्यंत देण्यात आला नव्हते हे वास्तव आहे.

चीन सरकारने २००२ व २००३ मधील सिव्हीयर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणझे ‘सार्स’ची साथ ज्या पद्धतीने हाताळली तेव्हापासून त्यांच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह लागले, ते आता अधिक गडद झाले आहे. २३ जानेवारीला वुहान येथून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली व एकूण ६ कोटी लोकसंख्या असलेल्या इतर शहरातही तसेच निर्बंध विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी घालण्यात आले. हुबेई व वुहान येथे अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यावर टीका झाली होती.

तरुण डॉक्टर ली वेनलियांग यांनी विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचे संदेश समाजामाध्यमांवर टाकले असता त्यांना पोलिसांनी बोलावून घेऊ न अफवा पसरवल्याबाबत तंबी दिली होती. नंतर या डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर चीनमध्ये समाजमाध्यमांवर जनक्षोभ व्यक्त झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीला तेथील दोन नागरी पत्रकारांनी आव्हान दिले होते, पण नंतर ते बेपत्ता झाले. बहुदा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे समजते.

त्यानंतर वेनलियांग यांच्या मृत्यूमुळे झालेल्या जनक्षोभाची दखल घेतल्याचा देखावा करीत कम्युनिस्ट पक्षाच्या हुबेई व वुहान येथील अधिकाऱ्यांना काढून तेथे नवीन अधिकारी नेमण्यात आले. पण ती केवळ रंगसफेदी होती.