उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात केले. राजधानी लखनौ येथे आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कैबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नामांतरणाची घोषणा उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिली होती. मात्र आता या निर्णयावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. आता जणू काही योगी आदित्यनाथ फक्त हिंदूंशी संबंधितच नावच सगळीकडे ठेवतील असे सुचवणारे ट्विट आव्हाडांनी केले आहे. मात्र यावेळी नेहमीचे आक्रमक शैलीतील आव्हाड न दिसता, उपरोधिक शैलीतील आव्हाड ट्विटमधून दिसले आहेत.

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून दिवाळीचे नाव बददल्याचे म्हटले आहे. ‘Diwali या शब्दामध्ये ‘Ali’ शब्द असल्याने दिवाळी सणाचे नाव बदलून ‘दीनदयाल दीया-बाती धूम-धड़ाका पर्व’ असे नाव ठेवण्यात आल्याचा टोमणा लगावला आहे.

त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पणती लावली तरी हिमालयातील बर्फ वितळून पूर येईल असे ट्विट केले आहे.

अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आल्यापासून योगी अदित्यनाथ यांना सोशल मिडियावरही चांगलेच ट्रोल केले जात आहे. #AajSeTumharaNaam हा हॅशटॅग वापरून नेटकरी योगी अदित्यनाथ एखाद्या व्यक्तीचे नाव बदलून काय ठेवतील या संदर्भातील मीम्स शेअर केले आहेत.